Last Updated on 24 Aug 2025 3:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संपूर्ण देशातील एक आदर्श महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा उरूण इस्लामपूर शहरात पुतळा उभा करणार असल्याची घोषणा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी उरूण इस्लामपूर येथील समारंभात बोलताना केली.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त प्रा.डॉ.मानसिंग ठोंबरे (इस्लामपूर) यांचे ‘कर्मयोगिनी अहिल्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर विद्यापीठा च्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनचे समन्व यक प्रा.डॉ.मच्छिंद्र गोफणे,प्रा.शामराव पाटील,विजयराव यादव,आनंदराव मलगुंडे, विजयराव पाटील, शहाजी पाटील,अरुणादेवी पाटील,सुस्मिता जाधव, प्रा.सुकुमार कांबळे, विवेक कोकरे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,तालुका अध्यक्षा सुनिता देशमाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आ.पाटील म्हणाले, अहिल्यादेवींनी राज्यकर्ता कसा असावा याचा परिपाठ देशाला घालून दिला आहे. त्यांनी स्वखर्चातून संपूर्ण देशात विखरलेल्या बारा जोतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, धार्मिकस्थळी रहाणे व अन्नदानाची व्यवस्था केली. त्यांनी राज्यावर चाल करून येऊ पाहणाऱ्या राघोबा पेशव्यांना पाठविलेला खलिता त्यांच्या धैर्याचे प्रतीक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या तालुक्याचे सुपूत्र आहेत. त्यांचा पुतळा राजारामबापू बँकेच्या माध्यमातून आपल्या शहरात उभा करीत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा आपल्या शहरात उभा करू. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती करून या कामास गती देऊ.
प्रा.डॉ.मानसिंग ठोंबरे म्हणाले,अहिल्या देवी या रणरागिणी होत्या. त्यांनी अब्दाली सारख्या शत्रूस सामोरे जात रजपूत व जाटांच्यावर मात केली आहे. त्यांनी १८ व्या शतकात विधवेला संपत्तीमध्ये हक्क, ३०० महिलांची फलटण,शेतकऱ्यांना पतपेढी मार्फत बि-बियाणे,दरोडेखोर-पार्ध्यांच्यावर वचक बसविताना त्यांच्या हाताला काम, जनतेची लूट करणाऱ्या भिल्लाच्या मुलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न, नव्या बाजार पेठा आणि विकेंद्रीत न्याय व्यवस्था आदी क्रांतिकारी कार्य केले आहे. अहिल्यादेवींना त्यांची जनता आई मानत होत्या, इतके उत्तम त्याचे प्रशासन व न्याय व्यवस्था होती.
प्रा.डॉ.मच्छिंद्र गोफणे म्हणाले,अहिल्यादेवी यांच्यावर अनेक संकटे आली, मात्र त्या कधी डगमगल्या नाहीत. उलट त्या या संकटांना सामोरे गेल्या. त्या परम शिवभक्त होत्या,म्हणून त्या केवळ कर्मकांड करीत बसल्या नाहीत. त्यांनी त्या काळात वेग- वेगळ्या राज्यांशी संबंध ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभा केली होती.
प्रारंभी महिला तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी स्वागत, तर शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी प्रास्ताविक केले. शहर उपाध्यक्षा मनिषा पेठकर यांनी आभार मानले. बजरंग गावडे, राजवीर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
विनायक पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब (धनी) पाटील, धनंजय कुलकर्णी, माणिक पाटील, शशिकांत पाटील, सुभाष सुर्यवंशी, संभाजी कचरे, अविनाश खरात, अनिल खरात, सुनिल मलगुंडे, बाबुराव हुबाले, किसन गावडे, आनंदराव दवणे, जयकर गावडे, लालासो वाटेगावकर, रवि वाघमोडे, संदीप पाटील, संग्राम जाधव, छाया पाटील, कमल पाटील, रोझा किणीकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व अहिल्यादेवी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोपर्यंत परत येणार नाही
आ.पाटील उरुण इस्लामपूर शहरातील साखळी उपोषणाचा उल्लेख करत म्हणाले, बाळासाहेब पाटील (धनी) आपण ऊरणातील सगळ्या भावक्या एकत्र करून बारा जोतिर्लिंगाच्या दर्शनाला निघा. आणि जोपर्यंत उरूणचा शहराच्या नावात समावेश केलेला मंत्रीमंडळाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत परत फिरणार नाही,असे सर्वाना कळवा. असे म्हणताच एकच हशा झाला.













































































