Last Updated on 17 Dec 2021 5:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले आरोग्य विभागाचे कौतुक
पालघर |
सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचवता येईल ज्यामुळे शीतसाखळी अबाधित राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल.
सदर उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास व सार्वजनिक आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक एन.एच.एम डॉ. रामास्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हयाच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरले आहे.
जव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झापमधील अंतर २५ कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ ९ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर यातून लगेचच ३०४ नागरिकांचे लसीकरणदेखील करण्यात आले. हा नाविन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने यशस्वीरितीने पूर्ण केला. यामुळे लसीची शीतसाखळी अबाधित राखणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळ आणि श्रमाची बचत होण्यास मदत झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले आरोग्य विभागाचे कौतुक
जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतुकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणतात.आधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रति समर्पित राहून एका वेगळ्या ऊर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह आरोग्य विभागातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.














































































