Last Updated on 26 Feb 2023 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांचे आवाहन
सांगली | परिवहन विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या काही ऑनलाईन सेवा या फेसलेस प्रणालीद्वारे अद्यावत करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी फेसलेस सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.
वाहनधारकांनी फेसलेस प्रणालीचा वापर केल्यास त्यांना कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. वाहनधारकांनी आधारक्रमांक व त्या आधारक्रमांकाशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादी बाबी संगणकीय प्रणालीवर अद्यावत करावा व https://parivahan.gov.in/parivahan व https://parivahan.gov.in/sarathi या प्रणालीवर आपल्या आधारक्रमांकाच्या आधारे ओटीपी प्राप्त करून संबंधीत सेवेच्या प्रणालीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पुढीलप्रमाणे फेसलेस सुविधांचा लाभ घेता येईल.
अनुज्ञप्ती विभागाकडील शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती पत्ता बदल, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, दुय्यम अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नुतनीकरण, अनुज्ञप्ती पत्ता बदल, धोकादायक वाहन चालक अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती विवरणपत्र, अनुज्ञप्तीमधील संवर्ग रद्द करणे, वाहक अनुज्ञप्ती नुतनीकरण, वाहक अनुज्ञप्ती पत्ता बदल, वाहन अनुज्ञप्ती दुय्यम प्रत. परिवहनेत्तर/परिवहन विभागाकडील वाहन हस्तांतरण,तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र पत्ता, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, कर्ज बोजा नोंद कमी करणे.परवाना विभागाकडील विशेष परवाना, तात्पुरता परवाना, प्राधिकारपत्र नुतनीकरण इत्यादी फेसलेस सुविधांचा लाभ घेता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.









































































