Last Updated on 04 Dec 2021 3:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एजाज पटेलने केली जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाची बरोबरी, मुंबई कसोटीत भारताकडून घेतले सर्व 10 बळी
मुंबई ।
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात किवी संघाचा गोलंदाज एजाज पटेलने आश्चर्यकारक कामगिरी केली.त्याने शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाच्या एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या.कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेणारा एजाज जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.याआधी,जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांना कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याचा करिष्मा करता आला होता.या सामन्यात एजाज पटेलने शानदार गोलंदाजी केली आहे.त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतासाठी चार विकेट घेतल्या त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या दिवशी सहा विकेट्स घेतल्या.
जिम लेकरने प्रथम एका डावात 10 विकेट घेतल्या
1956 मध्ये,इयान जॉन्सनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ ऍशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर आला होता.या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवण्यात आला.या सामन्यात जिम लेकरने आपल्या गोलंदाजीने इतिहास रचला.इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 459 धावांच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ पहिल्या डावात 84 धावांत गारद झाला.जिम लेकरने पहिल्या डावात 9 विकेट घेतल्या.त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाठपुरावा केला.दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाज जिम लेकरसमोर हतबल झालेला दिसला.दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत कांगारू संघाचे सर्व 10 गडी बाद केले.अशा प्रकारे त्याने एका कसोटी सामन्यात 19 विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचला
1999 साली पाकिस्तानचा संघ वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर (आताचे अरुण जेटली स्टेडियम) खेळला गेला.4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात अनिल कुबळेने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात इतिहास रचला.त्याने पास्तिस्तानच्या दुसऱ्या डावात प्राणघातक गोलंदाजी करताना सर्व 10 बळी घेतले कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 विकेट घेणारा अनिल कुंबळे जगातील दुसरा गोलंदाज ठरला.या सर्व विकेट त्याने दुसऱ्या डावात 74 धावांत घेतल्या.
22 वर्षांनंतर एजाज पटेलने एका डावात 10 विकेट घेतल्या
जवळपास 22 वर्षांनंतर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलने एका डावात सर्व 10 विकेट घेण्याचा करिष्मा केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या कसोटीत त्याने हा विक्रम केला. एजाजने भारताच्या पहिल्या डावात 119 धावांत सर्व 10 बळी घेत इतिहास रचला.











































































