Last Updated on 27 Oct 2021 5:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीने (ईपीसी) मान्यता दिली आहे.याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता 2,117 कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशांमधे सांगितले. या कामासाठी आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री.गडकरी यांनी दिली.
नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नागनदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली आहे. नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजल पातळी वाढविण्यात आल्यास नदी पुनरुज्जीवित होईल,असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता .
नागनदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचा परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या आजच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे .











































































