Last Updated on 29 Dec 2024 8:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! १७ एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होणार
मुंबई । नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं व्यावसायिक विमान उतरलं. मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेलं इंडिगो कंपनीचं हे विमान दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी धावपट्टीवर उतरलं. ही चाचणीही यशस्वी झाल्यामुळे विमानतळ कर्मचारी, सिडकोचे अधिकाऱ्यांनी विमानाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.
त्यानंतर विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. १२ डिसेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणानं दक्षिण धावपट्टीवर फ्लाईट कॅलिब्रेशन करून यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर प्रवासी विमान उतरवण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ ला हवाई दलाचं सी-295 आणि सुखोई या दोन विमानाचं लँडिंग करून यशस्वी चाचणी करण्यात आली होती.
नवी मुंबई विमानतळाचं सुमारे ८४ टक्के बांधकाम काम पूर्ण झालं असून येत्या १७ एप्रिलला या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. अशी माहिती सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांनी दिली.
हे विमानतळ सुरु झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतूक सुरू होईल तसंच सुमारे १० ते १२ दशलक्ष प्रवासी वाहतूक अपेक्षित असून हे वाहतूक दरवर्षी 20 दशलक्षपर्यंत वाढेल असं अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. नवी मुंबई विमानतळ या ग्रीनफिल्ड विमानतळामुळे बंदरे, रेल्वे, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतुकीशी उत्तम कनेक्टिव्हीटी निर्माण व्हायला मदत होणार आहे.
Courtesy : Prasar Bharati









































































