Last Updated on 17 Feb 2025 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : देशाला समृद्ध करायचं असेल तर शहरांबरोबर ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RIT) येथे आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशिअम इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गडकरी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील उपस्थित होते.
यावेळी खा. विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आ. अरूण लाड, आ. रोहित पाटील, आ. सुहास बाबर, माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, संस्थेचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, शिक्षण ही अशी गोष्ट आहे, ज्यावर होणारी कॅपिटल इन्वेस्टमेंट ही भविष्यातील पिढी निर्माण करण्यासाठीचा खर्च आहे. देशाला खरा अर्थाने समृद्ध आणि संपन्न बनवायचं असेल तर शहरी भागाच्या बरोबरच जोपर्यंत गावांचा विकास होणार नाही तोपर्यंत भारत हा समृद्ध बनू शकत नाही हे सत्य आहे. महात्मा गांधी ९० टक्के लोक खेड्यात राहतात असे सांगत होते. मात्र, आज यापैकी ३५ टक्के लोक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. हे स्थलांतर आनंदाने झालेले नाही, तर सुविधांच्या अभावाने झाले आहे. यातून शहरी भागात झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. जीडीपीमध्ये २२ ते २४ टक्के वाटा उद्योगाचा, ५२ ते ५४ टक्के सेवाक्षेत्राचा आहे, तर केवळ १४ टक्के वाटा ग्रामीण व शेतीचा आहे. जर ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर चांगले रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हे झाले तरच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो.
…तर आपण जगात राज्य करू शकतो
गडकरी म्हणाले, आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे. 5 ट्रिलियन ड्रॉलरची इकोनॉमी तयार करायची आहे. या देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायची आहे. हे जर करायचं असेल, तर आपल्या इथे सर्वात मोठी देणगी आपल्याकडे आहे. जगातील सगळ्यात यंग टॅलेन्टेड इंजीनिअरिंग मॅन पॉवर जगात कुठल्या देशात असेल, तर त्या देशाचं नाव हिंदूस्थान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपलं भविष्य उज्ज्वल आहे. मधल्या काळात आपल्या देशातून आयआयटीमधून जे विद्यार्थी पास झाले, त्यांनी एमबीए केलं. यूरोपिअन आणि अमेरिका देशात ते सर्व सीईओ आहेत. त्यांचा पगारही कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. आपली तरुण मुलं जगात जाऊन किती मोठं काम करतात. मायक्रॉसॉफ्ट, गुगल असेल, जगातील मोठ मोठी रिसर्च असतील, या सगळ्यात भारतीय इंजीनिअर्सचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे ज्ञानाच्या भरवशावर आपण जगात राज्य करू शकतो.
यावेळी जयंत आ. पाटील यांनी मंत्री गडकरी यांचे देशभर झालेल्या रस्ते विकासाचे श्रेय देत कौतुक केले. पेठ- सांगली रस्त्याचे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा ४६ टक्के कमी दराने निविदा मंजुरी होउनही चांगल्या दर्जाचे झाले आहे असे सांगत राज्यात मात्र २५ ते ४५ टक्के अधिक दराने रस्त्याची कामे होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
गडकरी यांना इस्लामपुरात बोलावले त्याचा वेगळा अर्थ काढू नका; जयंत पाटील यांनी दिला चर्चेला पूर्णविराम
नितीन गडकरी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालवू नका असा मिश्किल सल्ला देत असे चिंतन करणार्या माध्यमांच्या कृतीचे शल्य वाटते. आज गडकरी साहेब आलेत. दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा झालेली आहे अशी खंत आ. पाटील यांनी व्यक्त केली.गडकरी यांना इस्लामपुरात बोलावले त्याचा वेगळा अर्थ काढू नका असेही ते म्हणाले. ‘तुम्ही कशाचीही बातमी कराल. यावरुन पत्रकारितेचा दर्जा ठरतो. तो तुमच्यावर ठरतो. मी त्यावर रागावणार नाही’, असं जयंत पाटील म्हणाले.
यावर गडकरी म्हणाले, आजचा कार्यक्रम राजकीय नाही जयंतराव माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी आलो आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच हवे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते, निवडून आला नाही तर तुम्ही पक्षाचे, आमदार, खासदार झाला तर जनतेचे आणि मंत्री झाला तर देशाचे हा विचार हवा. राजकारण हे विकासाचे हवे, केवळ सत्तेचे राजकारण देशाचा विकास करू शकत नाही. राजकारणात होणारी टीका ही मनावर फारशी घ्यायची नसते. केवळ बातम्यामधून उपस्थित केल्या जाणार्या शंकांमुळे संवेदनशील राहू नये.














































































