Last Updated on 16 Dec 2023 9:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी 24×7 वीजपुरवठा होण्याची गरज केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी व्यक्त केली आहे.देशाची ऊर्जासुरक्षा केवळ नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांच्या आधारे गाठता येणार नाही; कारण सौर ऊर्जा दिवसभर उपलब्ध नसते आणि पवन ऊर्जा निसर्गतः अधूनमधून मिळते.आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण क्षमतेत अशी भर घातली पाहिजे, जेणेकरून दिवसभर विनाव्यत्यय वीज मिळेल. शिवाय, नूतनीकरणक्षम परंतु भिन्न-भिन्न प्रमाणात आणि अधूनमधून ऊर्जा पुरवठा करणाऱ्या स्रोतांना मोठ्या प्रमाणावर विद्युतजाळ्याशी – ग्रिडशी जोडून घेण्यासाठीही बेस-लोड म्हणून काम करू शकणारे आणि ग्रिडचे संतुलन साधणारे वीजनिर्मिती स्रोत आवश्यक आहेत.त्यामुळे, ऊर्जा साठवणुकीचे किफायतशीर पर्याय उपलब्ध होईपर्यंत कोळसाधारित विद्युतनिर्मितीवरील अवलंबिता तशीच ठेवावी लागण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.
देशाची विजेची मागणी वेगाने वाढत आहे कारण आपण 2.86 कोटी नवीन उपभोक्त्यांची भर घातली आहे आणि आपली अर्थव्यवस्था वेगाने वृद्धी पावत आहे. वित्तीय वर्ष 2013-14 मध्ये सर्वोच्च मागणी 1,35,000 मेगावॅट होती. चालू वित्तीय वर्षात (नोव्हेंबर पर्यंत 2023) सर्वोच्च मागणी 2,43,000 मेगावॅटपर्यंत वाढली आहे. विसाव्या विद्युत ऊर्जा सर्वेक्षणानुसार वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये 2,77,200 मेगावॅट तर वित्तीय वर्ष 2031-32 मध्ये 3,66,400 मेगावॅट इतकी सर्वोच्च मागणी अंदाजित/ प्रक्षेपित आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने केलेल्या वीजनिर्मिती नियोजन अध्ययनानुसार, वित्तीय वर्ष 2032 पर्यंत कोळसाधारित विद्युतविषयक स्थापित (इन्स्टॉल्ड) क्षमतेची गरज 2,83,000 मेगावॅट असेल, तर सध्याची स्थापित क्षमता 214000 मेगावॅट आहे.
देशाच्या विकासासाठी विनाव्यत्यय/अखंड वीजपुरवठा होण्याची खातरजमा करण्यासाठी, 2023-32 या काळात अंदाजित क्षमतावृद्धी पुढीलप्रमाणे-:
- औष्णिक वीजनिर्मितीची 27180 मेगावॅट क्षमता उभारली जात आहे आणि 2031-2032 पर्यंत एकूण अंदाजित औष्णिक विद्युतक्षमता 87910 मेगावॅटने वाढण्याची अपेक्षा आहे.
- जलविद्युतच्या बाबतीत, बंद पडलेले प्रकल्प धरून 18033.5 मेगावॅट क्षमता उभारली जात आहे आणि 2031-2032 पर्यंत एकूण अंदाजित जल विद्युतक्षमता 42014 मेगावॅटने वाढण्याची अपेक्षा आहे.
- अणूऊर्जेचा विचार करता, 8000 मेगावॅट क्षमता उभारली जात आहे आणि 2031-2032 पर्यंत एकूण अंदाजित अणू विद्युतक्षमता 12200 मेगावॅटने वाढण्याची अपेक्षा आहे.
- नूतनीकरणक्षम ऊर्जेची 78935 मेगावॅट क्षमता उभारली जात आहे आणि 2031-2032 पर्यंत एकूण अंदाजित नूतनीकरणक्षमा विद्युतक्षमता 375279 मेगावॅटने वाढण्याची अपेक्षा आहे.
औष्णिक विजेची एकूण स्थापित क्षमता 2,39,072 मेगावॅट असून यात महाराष्ट्राच्या 27063 मेगावॅटचाही समावेश आहे. त्याची सविस्तर सूची परिशिष्टामध्ये दिलेली आहे.
यावरून, देशात एकूण 132148.5 मेगावॅट विद्युतनिर्मिती क्षमता उभारली जात असून, 2031-2032 पर्यंत क्षमतेत 517403 मेगावॅटची भर पडण्याचा अंदाज आहे.
लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दि. 14 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांनी ही माहिती दिली.









































































