Last Updated on 19 Dec 2023 8:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्र सरकारने अलीकडेच महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे. 15 हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना कृषी क्षेत्राशी निगडित कार्यासाठी (खते आणि कीटकनाशक फवारणी) ड्रोन प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
दीनदयाल अंत्योदय योजना (DAY-NRLM) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘अ’ श्रेणी असलेले महिला बचत गट ड्रोन प्रदान करण्यासाठी निवडले जातील.मिरची,कापूस,भात,गहू इत्यादी व्यावसायिक पिके घेणार्या तसेच फळबागा आणि वृक्षारोपण करणाऱ्या गावांच्या समूहांमधून हे ‘अ’ श्रेणी महिला बचत गट निवडले जातील.
2023-24 ते 2025-2026 या तीन वर्षांच्या कालावधीत 15 हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना प्रत्येकी एक ड्रोन वितरीत करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पासाठी 1,261 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.












































































