Last Updated on 24 Mar 2022 10:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
देवस्थान इनाम जमिनीबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन निर्णय लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सरोज आहिरे यांनी नाशिक जिल्ह्यातील विहीतगाव, मनोली, बेलतगव्हाण, तिरडशेत या गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार, योगेश सागर यांनी भाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.थोरात म्हणाले, गुजरात सरकारने देवस्थान इनाम जमिनीबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक नवीन कायदा आणला आहे. राज्य शासन याचा देखील अभ्यास करून राज्यात हा कायदा कशा प्रकारे आणता येईल तसेच मा. उच्च न्यायालयाचे निष्कर्ष व यापूर्वी वेळोवेळी विधी न्यायालयाने देवस्थान जमिनीच्या संदर्भात दिलेले निष्कर्ष देखील विचारात घेऊन याचा अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.








































































