Last Updated on 20 Jul 2025 6:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एच.आय.व्ही. बाधित वधू-वर परिचय मेळाव्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली । एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्यांना एक चांगले वैवाहिक जीवन जगता यावे या उद्देशाने त्यांच्यासाठी वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा आनंदाचा दिवस असून, त्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी एकमेकांशी संवाद साधावा. एकमेकांना समजून घ्यावे. दुसऱ्याला समजून घेणे हा कुटुंब उभा करण्याचा पाया आहे. त्यासाठी स्वत:ही बदलावे लागते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या विवाह इच्छुक व्यक्तीसाठी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली, सर्व एआरटी केंद्र सांगली, सांगली मिशन सोसायटी, एन.एम.पी. प्लस पुणे व सर्व अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सांगली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अप्पर तहसिलदार सांगली अश्विनी वरूटे, जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापक डॉ. विवेक सावंत, समन्वयक प्रमोद संकपाळ, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, संग्राम संस्थेच्या मीना शेषु यांच्यासह, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम राष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आरोग्य विभाग, तसेच कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाने चांगली भूमिका निभावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जोडीदार निवडताना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी नाते घट्ट राहिले पाहिजे हे पहावे. समोरच्या व्यक्तिच्या इच्छा आकांक्षाना प्राधान्य द्यावे. समाज घडविताना सर्व घटक घडला गेला पाहिजे. पुरोगामी विचारांची चळवळ सर्वांनी जपावी. एकमेकांचा चांगल्या पध्दतीने सांभाळ करावा. तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश, सुर्योदय कायम रहावा, आयुष्य सुखाचे व्हावे, आनंदाचे व्हावे, आई वडीलांची इच्छा तुमच्याकडून पूर्ण व्हावी, अशा शुभेच्य्छा त्यांनी वधु-वर परिचय मेळाव्यासाठी आलेल्यांना दिल्या.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथूनही लोक आले असून मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, एचआयव्ही बाधितांनी नियमितपणे औषधोपचार घ्यावा, व्यायाम करावा, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीडी4 काऊंट सहा महिन्यातून तपासावे. एआरटी सेंटरमधील मोफत औषधोपचाराचा लाभ घ्यावा, वैद्यकीय सल्ला नित्यनियमाने घ्यावा, त्यामुळे जीवन सुखकर होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, एचआयव्ही संसर्गित ज्या व्यक्ती एआरटी सेंटरमध्ये नियमितपणे उपचार घेत आहेत, ज्यांचा सीडी 4 काऊंटडाऊन चांगला आहे, व्हायरल लोड कमी आहे, अशा व्यक्तींना चांगले जीवन जगता यावे यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मानवतावादी दृष्टीकोन व संकल्पनेतून हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास वेगवेगळ्या राज्यातूनही उमेदवार उपस्थित असून हा वेगळी दिशा देणारा कार्यक्रम आहे. एचआयव्ही बाधितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, आवश्यक मदत करू असे आश्वासित करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मराठा सेवा संघाने हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचा हॉल मोफत देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी डॉ. संजय पाटील व मीना शेषु यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन एआरटी सेंटरचे समुपदेशक विश्वास मागाडे यांनी केले. आभार आयसीटीसी सांगलीचे समुपदेशक महिवपती बल्लाळ यांनी मानले. कार्यक्रमास स्वयंसेवी संस्था, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, विवाह इच्छुक वधु-वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात जवळपास 245 वधू-वरांचे नोंदणीकरण झाले.










































































