Last Updated on 03 Dec 2021 11:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने घेतला. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने दमदार शतक ठोकत भारताचा डाव सावरला आहे. भारताने मयांकच्या शतकामुळे पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने विराट कोहली, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना तंबूत धाडत भारताचे कंबरडे मोडले. केन विल्यमसनऐवजी टॉम लॅथमकडे न्यूझीलंडची कमान सोपवण्यात आली आहे. दुखापतीमुळे या कसोटीतून विल्यमसन बाहेर पडला आहे.
दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयांकने आपले शतक पूर्ण केले. मयांक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचक संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. पहिल्या दिवसअखेर भारताने ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या. मयांक १४ चौकार आणि ४ षटकारांसह १२० तर वृद्धिमान साहा २५ धावांवर नाबाद आहे.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी भारताने दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेऐवजी विराट कोहली, इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाऐवजी जयंत यादव यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. तसेच न्यूझीलंडने केन विलियम्सनऐवजी डॅरिल मिशेलला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, विल्यम सोमरविले, एजाज पटेल
भारत: मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.














































































