Last Updated on 20 Nov 2021 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
मार्च २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असून,या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे.मंडळाने परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार करून नुकतेच ते शिक्षण विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.शिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल,अशी भूमिका राज्य मंडळाने मांडली असल्याचे समजते.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन स्वरूपात मार्चमध्ये घेण्याची तयारी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केली जात आहे. या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला असून, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून त्याला मान्यता मिळाल्यास पुढील आठवड्यात दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात गुरुवारी झालेल्या अंतिम सुनावणीनंतर देशभरात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार याविषयी विद्यार्थी, पालकांसह शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातही उत्सुकता होती.










































































