Last Updated on 14 Sep 2024 9:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गौरी व घरगुती गणेश विसर्जना दिवशी सांगली व सातारा जिल्ह्यातील 425 श्री सदस्यांच्या मार्फत सुमारे 21 टन निर्माल्य संकलन केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असते.यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप यासारखे अनेक उपक्रम राबवत असते. आजकाल पाण्याचे प्रदूषण वाढलेले आहे त्यातच गणेशोत्सवामध्ये निर्माण होणारे निर्माल्य जर पाण्यात सोडले तर त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते व त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हा धोका ओळखून गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माण होणारे निर्माल्य जमा करून त्यापासून खत निर्मितीचा उपक्रम डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने हाती घेतला. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यामध्ये सांगली जिल्ह्यात बहे, शिराळा, येलूर, औदुंबर, सांगली, कवठे महांकाळ, आटपाडी, विटा, अमणापूर, अळसंद तासगाव या 11 ठिकाणी गौरी व घरगुती गणेश विसर्जनादिवशी सांगली व सातारा जिल्ह्यातील 425 श्री सदस्यांच्या मार्फत सुमारे 21 टन निर्माल्य संकलन केले. त्या निर्माल्यापासून गांडूळ खत तयार करून वेगवेगळया ठिकाणी वृक्ष लागवड व संगोपन करीता त्या वृक्षाना हे खत वापरले जाते. दरम्यान, अनंत चतुर्दशी दिवशी सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन केले जाणार आहे.










































































