Last Updated on 14 Oct 2021 12:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी काळात सुरू होणार्या टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या मार्गदर्शक असणार आहे. विशेष म्हणजे तो या पदासाठी कोणतेही मानधन घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) जय शाह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
येत्या १७ ऑक्टोबरपासून टी २० विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिग धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. २००७ साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने टी २० विश्वचषक जिंकला होता. यानंतर मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय संघाला करता आली नाही. १४ वर्षांचा हा वनवास संपवण्यासाठी यंदा धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
जय शाह म्हणाले की, एम.एस. धोनी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून कोणतेही मानधन घेत नाही. बीसीसीआयने १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
धोनीचा समावेश म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही!
धोनीच्या नियुक्तीबाबत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले होते की, धोनीच्या उपस्थितीचा भारताला नक्कीच फायदा होईल. धोनी एक महान कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी २० विश्वचषक, २०१० आणि २०१६ आशिया चषक, २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याचे रेकॉर्ड जबरदस्त आहेत. आयसीसी विश्वचषकासाठी त्याला संघाचे मार्गदर्शक म्हणून घेणे संघासाठी फायदेशीर आहे. सर्व खेळाडू धोनीचा आदर करतात. त्याचा समावेश करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही. त्याने एक अद्भुत काम केलं आहे. म्हणूनच त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.











































































