Last Updated on 03 Oct 2021 1:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदी लेखक आणि कथाकथनकार द. मा. मिरासदार (D M Mirasdar) यांचे आज निधन झाले. द. मा. मिरासदार यांचे वयाच्या ९४ वर्षी वृद्धापकाळानं पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. द. मा. मिरासदारांचा जन्म १९२७ मध्ये झाला होता.
मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली.
मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन मराठी चित्रपटांतील संवाद लेखनासाठी मिरासदारांना पुरस्कारदेखील मिळाले होते. मिरासदारांनी ग्रामीण जीवनाची नाडी अचूक ओळखली होती. त्यांच्या लेखनात, कथांमध्ये अस्सल गावरान पात्रे दिसतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल बेरकी, वाह्यात, टारगट पात्रे रसिकांच्या मनाला भावून गेली.
अनेक पुरस्कारांनी मिरासदारांना सन्मानित करण्यात आले आहे, राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. आपल्या लेखनाने आणि सादरीकरणाने महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या साहित्यिकाला महाराष्ट्र नेहमीच आठवत राहणार आहे. मराठी साहित्यविश्वातील त्यांचे स्थान अढळ आहे. अलीकडच्या काळात विनोदी लेखन आणि कथाकथनाला लागलेली ओहोटी लक्षात घेता मिरासदारांसारख्या जबरदस्त ताकदीच्या लेखकाची उणीव महाराष्ट्राला कायमच भासत राहणार आहे. मिरासदारांनी मराठी रसिकांची नाडी अचूक ओळखली होती मात्र त्याचबरोबर साहित्याचा दर्जादेखील उंचावला होता. आपल्या खास शैलीने त्यांनी लोकांवर अक्षरश: गारुड केले होते.














































































