Last Updated on 04 Jan 2022 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे |
‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले.त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज त्यांचे निधन झाले.
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यात १४ नोव्हेंबर १९४८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या त्या कुणालाच नकोशी होत्या म्हणून त्यांना चिंधी म्हटले जायचे. सिंधोताई चौथीपर्यंत शिकल्या.सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली.अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या.सिंधूताई सपकाळ यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, ममता बाल सदन आणि सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था अशा संस्था स्थापन केल्या. अनाथ बालकांना सर्व शिक्षण देणे, त्यांच्या जेवणाची, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धत करून देणे, शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीमार्गदर्शन, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देण्याचे त्यांच्या विवाहाचे आयोजन अशी अनेक कार्य त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आली आहेत.
सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला. 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल नॅशनल अॅवॉर्ड’च्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.













































































