Last Updated on 05 Dec 2021 12:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
42 वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास अखेर थांबला!
नई दिल्ली ।
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे आज दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. विनोद दुआ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ यांनी माहिती दिली आहे. दुआ यांच्यावर रविवारी दुपारी १२ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनोद दुआ आणि त्यांची पत्नी पद्मावती तथा चिन्ना दुआ हे दोघेही करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले होते. दोघांनाही गुरुग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे चिन्ना दुआ यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर विनोद दुआ करोनातून बरे झाले मात्र, प्रकृतीच्या कुरबुरी सुरूच होत्या. इतर व्याधींनी त्यांना ग्रासले. दरम्यान, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
तब्बल 42 वर्षाहून अधिक पत्रकारिता
विनोद दुवा यांची पत्रकारिता आजही अनेकांसाठी आदर्शवत अशीच आहे. त्यांनी जवळपास 42 वर्षाहून पत्रकारिता केली आहे. विनोद दुवांचे महत्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचं विश्लेषणाला सुरुवात केली. त्यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये हा ट्रेन्ड सुरु झाला. विनोद दुवा यांनी दूरदर्शनासहित अनेक टीव्ही चॅनेल्सवर बातमीदारी केली होती.
विनोद दुआ यांचा NTDV शी दीर्घकाळ संबंध आहे. NDTV मध्ये असताना ते ‘खबरदार इंडिया’ कार्यक्रम करत असत. तसेच ‘विनोद दुआ लाइव्ह’सारखे महत्त्वाचे कार्यक्रम केले. ‘जायका इंडिया का’ हा एनडीटीव्हीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता. दूरदर्शनवर ‘जनवाणी’ने आपली ओळख निर्माण केली. विनोद दुआ हे दूरदर्शनवरील निवडणुकीच्या विश्लेषणासाठीही खूप प्रसिद्ध होते.
विनोद दुवा यांची कारकीर्द
- विनोद दुवा यांनी प्रणय रॉय यांच्यासोबत 1984 साली दूरदर्शनवर निवडणूक विश्लेषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला वेगळी दिशा मिळाली.
- 1992 साली झी टीव्हीमध्ये काम सुरु केलं.
- 1996 साली विनोद दुवा यांना रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आलं.
- 1998 साली त्यांनी सोनी टीव्हीवर चुनाव चुनौती हा कार्यक्रम सुरु केला.
- 2000 ते 2003 दरम्यान सहारा वाहिनीमध्ये काम केलं.
- झायका इंडिया का हा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम त्यानी होस्ट केला.
- 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.
- 2017 साली पत्रकारितेतील रेड इंक पुरस्कार देण्यात आला.
- त्यांनी एसडब्लू न्यूजचे सल्लागार संपादक म्हणून काम केलं.
- त्यांनी द वायर वर जन गण मन की बात हा कार्यक्रम सुरु केला.














































































