Last Updated on 06 Feb 2025 2:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. उत्तम लेखक आणि समीक्षक असणाऱ्या द्वारकानाथ यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि समीक्षक विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.
पेशानं सिव्हिल इंजिनिअर असलेले द्वारकानाथ संझगिरी सुरुवातीच्या काळात मुंबई महापालिकेत नोकरी करत होते. मात्र, क्रिकेट आणि मराठी साहित्याविषयी त्यांचा गाढा अभ्यास होते. द्वारकानाथ संझगिरी म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील किश्श्यांची मैफल होती. मात्र ही मैफल अर्ध्यावर सोडून संझगिरींनी चाहत्यांना मोठा धक्का दिला. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले होते. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले.
त्याचबरोबर द्वारकानाथ संझगिरी यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. मराठी वृत्तपत्रात क्रीडाविषयक स्तंभलेखनासोबतच परदेशी दौरे, चित्रपटातील गाणी अशा विविध विषयांवर संझगिरींनी तीन डझनांहून अधिक पुस्तके लिहिली. खेलंदाजी, बोलंदाजी, क्रिकेट कॉकटेल, भटकेगिरीसारख्या प्रवासवर्णनासह मराठी क्रिकेटरसिकांनी द्वारकानाथ संझगिरींच्या लिखाणाला नेहमीच दिलखुलास पसंती दिली.
उद्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी (दि. 7) दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले. त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबियांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि योगदान अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलिकडे जावून क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ, खेळाडूं आणि क्रीडारसिकांना जोडण्याचं काम केलं. क्रीडाक्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जिवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडारसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रताप सरनाईक यांनी केले दुःख व्यक्त
साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख अगदी लहान मुलांपासून ते प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक असणाऱ्या संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला आहे स्वर्गीय द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये ट्विट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले, ”द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ३८ वर्षांचा मित्र, इतक्या सामायिक आठवणी आणि इतक्या सौंदर्याने, शैलीने आणि रंगाने लिहिणारा असा एक माणूस. एखाद्या गोष्टीचे प्रत्यक्ष चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील असे त्यांचे लेखन होते.”














































































