Last Updated on 30 Jun 2020 10:35 AM by
सध्या जगामध्ये १२५ दशलक्ष जुळ्यांची नोंद आहे.हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १.९ टक्के आहे. अमेरिकेमधल्या साधारणत: एक हजार गरोदर स्त्रियांमध्ये २५ ते ३० महिलांना तर युरोपमध्ये २० महिलांना जुळ्यांचा लाभ होतो. जपान तसेच आशियाई देशांमध्ये मात्र हे प्रमाण कमी म्हणजे दरहजारी ६ ते ८ इतके आहे. तिळ्यांच्या जन्माचे प्रमाण खूपच कमी म्हणजे साधारण सात हजार गरोदर स्त्रियांमागे एका गरोदर स्त्रीला तिळे असे आहे. विशिष्ट प्रदेशामध्ये-गावामध्ये जुळ्यांचे प्रमाण अधिक अशी काही उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ नायजेरियातील योरूबा या गावामध्ये एक हजार गरोदर स्त्रियांपकी ४५ ते ५० स्त्रिया जुळ्यांना जन्म देतात. जगात हे प्रमाण सर्वाधिक म्हणता येईल.
जुळ्यांचे गाव : कोडिंजी
केरळ राज्यात उत्तरेच्या बाजूला,सुमारे पंधरा हजार लोकवस्तीचे,‘कोडिंजी’ या नावाचे एक गाव आहे. केरळामधल्या इतर सर्वसाधारण गावांसारखेच हे गाव आहे. गावाच्या चारी बाजूंना हिरवीगार भात शेती दिसते. भातशेती असल्याने खाचरांच्यात पाणी नेहमी भरलेले असते.पावसाळ्यात तर गाव पाण्याने वेढले जाते व गावाशी संपर्क ठेवणेही कठिण जाते.या गावात जर तुम्ही गेलात तर आपल्याला ड्बल व्हिजनचा त्रास होतो आहे की काय असे तुम्हाला वाटल्याशिवाय रहाणार नाही.
दोन हजार कुटुंबे रहात असलेल्या या गावात,तब्बल २३० जुळी भावंडे आहेत.या गावातील प्रत्येक एक हजार बालजन्मांच्यात ४५ जुळी भावंडे जन्मतात. जगभरच्या सरासरीपेक्षा ही संख्या ६ पटीने जास्त आहे. गावातील सर्वात वयस्कर जुळी भावंडे आज ६५ वर्षाची आहेत. १५ जून २००९ रोजी जन्मलेल्या रिफा आणि रिथा या भगिनी सर्वात छोट्या जुळ्या बहिणी आहेत.या गावात ‘कोडिंजी ट्विन्स ऍंड किन्स असोसिएशन’ या नावाची, जुळ्यांची एक संस्थाही आहे.या संस्थेच्या माहितीप्रमाणे, गरोदर असलेल्या ५ आणखी स्त्रियांना, जुळी मुले पुढच्या काही महिन्यात होणार आहेत.
पाश्चिमात्य जगात आणि भारतातील शहरी भागांत विवाहाचे वय, मुलींचे करीयर वगैरे सारख्या अडचणींमुळे पुष्क़ळ जोडप्यांना अपत्यप्राप्तीसाठी गर्भ रहाण्यासाठीची औषधे किंवा कृत्रिम गर्भधारणा यासारखी वैद्यकीय मदत अलीकडे घ्यावी लागते. यामुळे अशा मदतीतून जन्माला येणार्या बालकांत, जुळ्या भावंडांचे प्रमाण आधिक असते. परंतु कोडिंजी गावातील बहुतेक तरुण तरुणी,१८ ते २० वर्षांपर्यंतच विवाहबद्ध होतात व त्यांना होणारी बालके ही कुठल्याही कृत्रिम उपायांशिवायच जन्मलेली असल्याने येथे जुळ्यांचे प्रमाण एवढे जास्त का आहे? हे अजून कोणालाच उमगलेले नाही.कोडिंजी गावात जन्माला येणारी बहुतांशी जुळी भावंडे ही एकासारखी न दिसणारी असतात म्हणजेच ती निरनिराळ्या गर्भांपासून जन्मलेली असतात.(सारखी दिसणारी जुळी भावंडे एकाच गर्भाचे विभाजन झाल्यामुळे जन्मतात.)पाश्चात्य व शहरी लोकांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ खूप असतात. येथले लोक असा कोणताही विशेष आहार घेत नाहीत. कोडिंजी गाव तसे एकाकी आहे.गावातील लोकांना कोणतीच धोकादायक औषधे किंवा जंतुनाशके यांचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच येथे एवढी जुळी मुले का? हा डॉक्टर्सना पडलेला प्रश्नच आहे.काही लोकांना हा कोडिंजीच्या पाण्याचाच गुण आहे असे वाटते.परंतु याला अजूनतरी कोणताच शास्त्रीय आधार सापडलेला नाही.
इतकी जुळी भावंडे या छोट्याश्या गावात असल्याने गावात गोंधळ,गंमत होण्याचे बरेच प्रकार सारखेच घडत असतात.बहुतेक भावंडांची नावे सारखीच असतात व ते सर्वसाधारणपणे सारखेच कपडे घालत असल्याने पालकांचा सुद्धा कोण झोपले आहे?आणि कोण खेळते आहे? हे सांगताना गोंधळ उडतो शाळेत शिक्षकांचा सुद्धा असाच गोंधळ उडतो.पुष्कळदा ही भावंडे आजारी पण एकदमच पडतात.अर्थात त्यांच्यात फरक पण असतातच. एकाला क्रिकेट आवडत असले तर दुसर्याला फुटबॉल आवडतो.
नायजेरियातही आहे जुळ्यांचे गाव : इग्बो-ओरामध्ये सर्वाधिक जुळे

नायजेरियातील इग्बो-ओरा शहर.जगभरात जुळ्यांची राजधानी म्हणून याची ओळख आहे. यामुळे येथे जुळ्या मुलांचा जन्मोत्सव साजरा करतात. हे फेस्टिव्हल शुक्रवारपासून सुरू झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. या फेस्टिव्हलमध्ये लहान मुलांपासून लहान-मोठे नागरिक या जुळ्यांना पाहण्यासाठी येत आहेत. इग्बो-ओरामध्ये जगात सर्वाधिक प्रमाणात येथेच जुळ्यांचा जन्म होताे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सनुसार, अमेरिकेत दर हजारी ३३ जुळे इतके प्रमाण आहे. तर इग्बो-ओरामध्ये हेच प्रमाण सरासरी ५० जुळे असे आहे. स्थानिक लोकांनी म्हटले, वसाहती होण्याच्या अाधीच्या काळात जुळ्यांचा जन्म नेहमी अशुभ मानला जात होता. परंतु आज त्यांना आशीर्वाद मानले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आजवर इग्बो-ओरामध्ये जुळ्यांचे प्रमाण जास्त का असते, हे एक कोडे आहे.
स्थानिक लोकांच्या मते, स्थानिक महिलांच्या आहारामुळे येथे जुळ्यांचा जन्म होण्याचा प्रमाण अधिक आहे. स्थानिक नेते सॅम्युअल अदेयुवी अडेले यांनी म्हटले, येथील लोक बेलाची पाने, भेंडीची पाने व आवळा मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. बेलाच्या पानात गॉनेडोट्रॉपिन नावाचा रासायनिक पदार्थ असतो. त्यामुळे महिलाच्या गर्भात अनेक अंडी तयार होतात. फर्टिलिटी तज्ञांच्या मते तसे वाटत नाही.अनुवांशिक कारण असावे, असे त्यांना वाटते.














































































