Last Updated on 12 Nov 2024 9:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अरबपतींची जितकी कर्जं माफ करतील, तितका पैसा आम्ही महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देऊ
गोंदिया । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अरबपतींची जितकी कर्जं माफ करतील, तितका पैसा आम्ही महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देऊ, असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे.
जितकी कर्जं उद्योगपतींची माफ केली, तितकी मदत राज्याला करू. गोंदिया इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. देशात सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर मागासवर्गीयांच्या खिशातून जातो, असंही ते म्हणाले. इतर मागासवर्गीय प्रवर्ग, आदिवासी समुदाय, दलितांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत, तसंच विविध क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याचं सांगून हा या समुदायांचा सर्वात मोठा अपमान असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावरची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची हमी त्यांनी राज्यातल्या मतदारांना दिली. ही विचारधारेची, राज्यघटनेची लढाई असून द्वेषाला प्रेमाने हरवण्याचा संदेश देणारं हे पुस्तक आहे. भारतीय राज्यघटनेनं देशाला एकता, प्रेम, समानता, सगळ्या धर्मांचा आदर करण्याची शिकवण दिली, भारताला आकार देणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या विचारांचा अंतर्भाव आहे, असं प्रतिपादन राहुल गांधींनी केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, नारायण गुरू, बसवेश्वर यांच्या विचारांतून निर्माण झालेली राज्यघटना हजारो वर्षं जुनी आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आडमार्गाने राज्यघटनेवर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला १०-१५ लोकांचा, अरबपतींचा भारत नको, आम्हाला शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा भारत हवा आहे, आम्हाला द्वेष नाही, तर प्रेम करणारा देश हवा आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
देशात ओबीसी, दलित, आदिवासी, वंचित या सगळ्यांची मिळून ९० टक्के लोकसंख्या आहे, ह्याच वर्गावर अर्थसंकल्पात अन्याय होत असून, जीएसटी च्या माध्यमातून जनसामान्याची लूट सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि म्हणूनच जातनिहाय जनगणना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मविआ चं सरकार सत्तेत आल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आणि धानाला योग्य हमीभाव देऊ, असंही आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.









































































