Last Updated on 06 Nov 2021 10:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदनगर |
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉकसक्रिटमुळे आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे.
इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली.जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.
श्री.भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते.मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
अतिदक्षता विभागाला (ICU) आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घटनेची माहिती दिली आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.
दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
नगर अग्नितांडव: पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, चौकशीनंतर कारवाई

जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. या घटनेमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी अहमदनगरला येत जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रात्री पाहणी केली. आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.










































































