Last Updated on 19 Oct 2021 12:27 AM by Sanjay Patil/Adhorekhit
आज कोजागरी पौर्णिमा साजरी केली जात आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.तसेच कोगाजरी पौर्णिमेच्या दिवशी आकाशातून अमृताचा पाऊस पडतो अशी एक धार्मिक श्रद्धा आहे.
वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा म्हणतात. या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात.
कोजागरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.यासोबतच भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. कोजागरी पौर्णिमेला विधीपूर्वक पूजा केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच आयुष्यात सुख आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.
कोजागरी पौर्णिमेला श्रीकृष्णाने रचली महारासलीला
भगवान श्रीकृष्णाने कोजागरी पौर्णिमेला महारासलीला रचली अशी आख्यायिका आहे. या दिवशी चंद्र देवाची विशेष पूजा केली जाते आणि खीर अर्पण केली जाते. रात्रीच्या वेळी खीर आकाशाखाली ठेवली जाते. असे केल्याने खीर अमृताच्या पावसापासून पवित्र अमृतासारखी बनते अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार या तिथीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.
कोजागरी पौर्णिमा शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 रोजी मंगळवारी आहे.
कोजागरी पौर्णिमा आरंभ – 19 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 7:03 वाजता
कोजागरी पौर्णिमा समाप्ती – 20 ऑक्टोबर 2021 बुधवारी रात्री 8.26 वाजता














































































