Last Updated on 08 Nov 2024 11:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आ. जयंत पाटील यांच्या ‘फोडा व जोडा’ नीतीला शह देणार : महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांची पत्रकार बैठक
सांगली । सर्व पारंपरिक विरोधकांनी आज एकाच व्यासपीठावर येत आ. जयंत पाटील यांच्या ‘फोडा व जोडा’ या रणनीतीला शह देण्याबरोबरच या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार केला. यानिमित्ताने गत तीन निवडणुकीत विस्कटलेली विरोधकांची घडी या निवडणुकीत एकवटली आहे.
महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या विजयासाठी एकदिलाने प्रयत्न करु परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी आज पत्रकार बैठकीत बोलताना केला.
येथील शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीस खा. धर्यशील माने, आ. सदाभाऊ खोत, उमेदवार निशिकांत पाटील, भाजपचे राहूल महाडीक, विक्रम पाटील, भाजपचे प्रसाद पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नायकवडी, सागर मलगुंडे, राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे केदार पाटील, मन्सूर वठारकर, दादासो पाटील, मनसेचे सनी खराडे, सतीश पवार उपस्थित होते.
खा. धर्यशील माने म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, येथे विरोधकांची ताकद मोठी आहे. पण ती ताकत विखुरलेली होती. आता सर्व गट एकदिलाने काम करुन राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री व इस्लामपूरात महायुतीचा आमदार करतील. ज्याप्रमाणे लोकसभेला काम केले तसेच काम विधानसभेलाही करु.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्या आदेशानुसार येथे महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या विजयासाठी आम्ही सर्वांनी एकीची वज्रमुठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, स्व. नानासाहेब महाडीक यांनी नगरपालिका निवडणूकीत विरोधकांच्या एकीची मुहुर्तमेढ रोवली होती. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. जयंत पाटील यांनी आजपर्यंत फोडा व जोडा ही नीती जनतेत रुजविली आहे. परंतू आता आम्ही सर्वजण मिळून त्यांची दडपशाही, गुंडगीरी मोडीत काढू.
हेही वाचा – जयंत पाटील विरोधक एकवटले? निशिकांत पाटलांच्या प्रचारात सर्व गट एकत्रित येणार…
राहूल महाडीक म्हणाले, महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या विजयाचा आम्ही सर्वांनी निर्धार असून आमच्या एकजूटीने आम्हाला यश येईल.
गौरव नायकवडी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आम्ही महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वजण एकदिलाने लढणार आहोत.
आनंदराव पवार म्हणाले, आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे व महायुतीतील नेत्यांच्या आदेशाने आम्ही कामाला लागलो आहे. निशिकांत पाटील यांचा विजय होईल.
विक्रम पाटील म्हणाले, जयंत पाटील यांचे सर्व पारंपारिक विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे निशिकांत पाटील चांगल्या मतांनी विजय होईल.
सागर मलगुंडे यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक सतीश महाडीक, अमीत ओसवाल, अजीत पाटील,प्रदीप लोहार, वीर कुदळे, नंदकिशोर निळकंठ, नंदकुमार पाटील, घनशाम जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी पुढाकार घेत निशिकांत पाटील यांना विजयी करण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघात घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. मंगळवारी जयंत पाटील यांच्या सर्व पारंपरिक विरोधकांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधला होता. त्यानंतर गुरुवारी खा. श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर येथे निशिकांत पाटील यांच्यासह सर्व जयंत पाटील पारंपरिक विरोधकांना बोलावून बैठक घेतली आहे. त्यात सर्वांनी जुने मतभेद विसरून जयंत पाटील यांना रोखण्याचे ठरले आहे. आणि आज सर्व पारंपरिक विरोधकांनी आज एकाच व्यासपीठावर येत आ. जयंत पाटील यांच्या फोडा व जोडा या रणनीतीला शह देण्याबरोबरच या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.












































































