Last Updated on 03 Oct 2021 12:39 AM by Sanjay Patil/Adhorekhit
लेहमध्ये फडकला 1400 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज, लांबी 225 आणि रुंदी 150 फूट; 49 दिवसात ध्वजाची निर्मिती
लेह : जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे आज गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये अनावरण करण्यात आले. लेहमधील झांस्कर टेकडीवर लावलेला हा तिरंगा खादीचा असून हाताने बनवलेला आहे. हा 225 फूट लांब, 125 फूट रुंद आणि वजन 1400 किलो आहे. तो बनवण्यासाठी 49 दिवस लागले. हा तिरंगा 37,500 चौरस फूट जागा व्यापतो.
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील यावेळी उपस्थित होते. हा सर्वात मोठा खादीचा ध्वज भारतीय लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटने तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.
150 सैनिक 2000 फूट उंचीवर घेऊ गेले
तो फडकवण्यासाठी, अभियंता रेजिमेंटच्या 150 सैनिकांनी तिरंगा खांद्यावर उचलला आणि जमिनीपासून 2000 फूट उंचीवर नेला. शिखर गाठण्यासाठी सैनिकांना दोन तास लागले.
देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी खादीच्या ध्वजाचा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर संदेश लिहिला आहे. देशासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण लेह-लडाखमध्ये झाले. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो, असे ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर असा तिरंगा तयार करून जवानांनी मातृभूमीला दिलेली ही सलामीच आहे.










































































