Last Updated on 06 Oct 2024 3:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.
दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की,
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

चाळीला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू
दरम्यान, चेंबूर येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथील सिद्धार्थ नगर येथील एका चाळीला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली असून या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जळून मृत्यू झाला. सिद्धार्थ नगर येथे अनेक चाली असून या पैकी एका चाळीला आग लागली. सर्व जण साखर झोपेत असल्याने आग लागल्याचे कुणाला कळले नाही. यातच सर्व सात जणांचा जळून मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सर्व जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.










































































