Last Updated on 22 Oct 2022 8:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील समारंभात कार्यकर्त्यांना दिलासा
सांगली । जे गेलेले आहे,ते परत येवू शकते.त्यामुळे आपले सरकार गेल्याबद्दल आपण चिंता करू नये.आपले सरकार पुन्हा येवू शकते,या शब्दात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील समारंभात कार्यकर्त्यांना दिलासा दिला.एक आदर्श गांव म्हणून साखराळे गावाची वाटचाल सुरू असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भाष्यही केले.
आ.पाटील यांच्या हस्ते 1 कोटी 42 लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ,तसेच गावातील विविध विकास कामांचे उदघाटन-भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,सरपंच बाबुराव पाटील,उपसरपंच तजमुल चौगुले,महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा अलका माने,जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,कोरेगावचे सरपंच मयूर पाटील,निवास पाटील,गट विकासाधिकारी आबासाहेब पवार,सहाय्यक अजिंक्य कुंभार प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील पुढे म्हणाले,आपल्या गावातील विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकदिलाने ग्रामपंचायत निवडणुकीस सामोरे जावा.राजेबागेश्वर कडून आपल्या गावात येणारा रस्ता मोठा व काँक्रीटचा करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण नळांना अद्यावत मीटर बसवत असल्याने पाणी व विजेची काटकसर होईल. भविष्यात गावासह सर्व वाड्यावस्त्यांना 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न करावा. आपण गावात सांस्कृतिक हॉल बांधल्याने गावातील सर्व सामान्य माणसांना छोटे-छोटे कार्यक्रम घेण्यास चांगला उपयोग होईल.यावेळी त्यांनी सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या कामाचे कौतुक केले.
विजयराव पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी या तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सातत्याने पिण्याचे पाणी,रस्ते, शाळा,आरोग्य आदी व्यवस्था उत्तम करण्याचे काम केलेले आहे. आम्ही बाळासाहेबदादा, आनंदरावभाऊ यांना सोबत घेऊन गावातील विकास कामांना गती देत सर्व संस्था आदर्श वत चालवीत आहोत. साखराळेने नेहमी आ.जयंतराव पाटील यांना मोठे पाठबळ दिलेले आहे. भविष्यातही आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू.
बाळासाहेब पाटील म्हणाले,आम्ही पूर्वी एकमेकांच्या विरोधात अनेक निवडणुका लढविल्या,मात्र कधी कटुता येऊ दिली नाही,आणि गावातील विकासात श्रेयवाद कधी येवू दिला नाही. युवा पिढीने ही परंपरा जपत गावातील विकास कामांचा थांबलेला निधी आणावा. यावेळी त्यांनी केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणावर टीका केली.
यावेळी पाणी पुरवठा योजनेच्या कामास जमीन दिल्याबद्दल बाबासो डांगे,राहुल मुसळे,तसेच आदर्श सरपंच बाबुराव पाटील, उपसरपंच तजमुल चौगुले,ग्रामपंचायतचे सदस्य,पतसंस्थेचे नूतन संचालक अमोल कुंभार यांचा आ.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सरपंच बाबुराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात गावातील विकास कामांचा आढावा मांडला.यावेळी इस्लामपूरचे धनंजय कुलकर्णी,युवक राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख,संचालक कार्तिक पाटील,सर्जेराव देशमुख,संभाजी जाधव, उपअभियंता जे.के.पाटील,आर.एस.कांबळे, अविनाश पाटील,भास्कर पाटील,शैलेश सुर्यवंशी,पी.बी.सुर्वे,राजेंद्र पाटील,प्रताप पाटील,शिवाजी डांगे,आनंदराव दवणे,सुशील पाटील,सुनील पाटील,शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.उपसरपंच तजमुल चौगुले यांनी आभार मानले. प्रा.अमोल पाटील,रामभाऊ चिवटे यांनी सूत्रसंचालन केले.











































































