Last Updated on 06 Nov 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घडयाळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घडयाळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं असे निर्देश न्यायालयानं दिलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट आहेत. शरद पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. अजित पवार गट न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करणे थांबवावे, असे त्यात म्हटले आहे. तसेच अजित पवार गटाला नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याची सूचना द्यावी.
या प्रकरणावर २४ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टातही सुनावणी झाली होती, ज्यात कोर्टाने अजित पवार गटाला दिलासा दिला होता. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते, परंतु निवडणूक बॅनर आणि पोस्टरमध्ये हे लिहावे लागेल की हा वादाचा विषय आहे आणि तो न्यायप्रविष्ट आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या वकिलांना नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास ते स्वत: अवमानाचा खटला चालवतील, असा इशाराही दिला.
तसंच दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर दयावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी दिला.









































































