Last Updated on 11 Oct 2022 8:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
🌑 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
🌑 21 ऑक्टोबरनंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
![]()
पुणे । ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.निवडणूक वेळेत होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागामध्ये गटातटाच्या जुळण्या-हालचालींना गती येणार आहे.कार्यकर्त्यांना आतापासूनच निवडणुकांचे वेध लागले आहेत.राज्यातील सुमारे 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत.
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649 तसेच नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण सुमारे 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला.प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यानंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता गावपातळीवर हालचालींना वेग येणार आहे.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आतापासूनच ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत.गटबांधणीला वेग आला आहे.काही गावांमध्ये प्रस्थापितांविरोधात युवावर्ग नाराज असल्याचे चित्र आहे.त्यामुळे काही ठिकाणी नव्या आघाड्या होण्याचे संकेत मिळत आहेत.काही गावांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजीचा सूर आहे.भ्रष्टाचाराची काही प्रकरणे चर्चेत आहेत.काही ठिकाणी गेली अनेक वर्षे तेच ते गट एकमेकांविरुद्ध लढताना दिसत आहेत.त्यामुळे ठराविक लोकांना पुन्हा-पुन्हा संधी मिळत आहे.गावाच्या विकासाला प्राधान्य मिळण्याऐवजी घर-वाडा आणि भावकीच्या राजकारणामुळे काही ठिकाणी गावाच्या विकासाला खो बसत असल्याचे चित्र आहे.
राज्यात काही ठिकाणी अनेकवर्षे काही प्रस्थापित पुढाऱ्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या राहिल्याने गावांना भरपूर निधी मिळूनही म्हणावा असा विकास झाला नाही असे चित्र आहे.गावाच्या विकासाची ना ब्लू प्रिंट ना भविष्याचे व्हिजन यामुळे काही ठिकाणी युवावर्गात नाराजी आहे.त्यामुळे काही नव्या आघाड्या निर्माण झाल्यास ते नवल असणार नाही.काही ठिकाणी तशा घडामोडी घडण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मतदार यादीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : मंगळवार दिनांक 31 मे 2022
प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक : गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2022
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी : गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्विकारण्यात येणार )
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे : शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022
![]()









































































