Last Updated on 30 Aug 2025 9:06 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मुहूर्त
हरितालिका पूजन मुहूर्त
मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025
प्रातः काळापासून दुपारी दीड पर्यंत
गणेश स्थापना मुहूर्त
बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025
प्रात: काळापासून दुपारी दीड पर्यंत
यासाठी कोणत्याही सूक्ष्म मुहूर्ताची आवश्यकता नसते .
टीप – सविस्तर माहितीसाठी गणेश पूजन 2025 लेख वाचा
गौरी, आवाहन,पूजन, विसर्जन मुहूर्त
आवाहन – रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 सायं . 05 वा. 27मि .पर्यंत
पूजन – सोमवार दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभर
विसर्जन – मंगळवार दि. O2 सप्टेंबर 2025
रात्री 09 वा. 51 मि.पर्यंत
बाकी या दिवशी कोणताही सुक्ष्म मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते
पंचांगाधार -दाते
लेखन – ज्योतिष शास्त्री -प्रभाकर जंगम
श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला की, झिम्माफुगडी आणि गौरी आगमनाच्या आनंदात गीतांच्या तालावर नाचणाऱ्या महिला आणि मुली सपूर्ण परिसर व कुटुंबामध्ये आगळ्या वेगळ्या आनंदाची एक वेगळीच पर्वणी. अंगणातील रांगोळी, गौरी आत घेताना होणारी लगबग, प्रवेशद्वारापासून आत गौरीची पुसटशी उठणारी कुंमकुंम् पावले, पाने, फुले यांचा घरामध्ये पसरणारा सुगंध आणि पूजेची तयारी… उत्सवाचा एक वेगळाच आत्मिक आनंद.
गौरी पूजेमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरीचे पूजन आपल्याकडे होते अर्थात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे काय?…
प्रथमत: गौरी म्हणजे ,”माझ्या मते स्त्रीशक्ती आणि भगवान शंकर म्हणजे पुरुषशक्तीचं प्रतिक”, हा संसाराचा गाडा चालवायचा म्हटलं तर पुरुषाबरोबर स्त्री असल्याशिवाय चालू शकत नाही, म्हणून गौरी पूजेमध्ये शंकरोबाचं ही पूजन केलं जातं पण शंकरोबा पेक्षाही गौरीला जास्त महत्व या पूजेमध्ये दिले जाते. कारण घर नावाची एक अशी गोष्ट आहे, घर म्हटलं की अनेक नातेसंबंध येत असतात आणि ते नातेसंबंध जोडून ठेवण्याची क्षमता ईश्वराने पुरुषापेक्षा निसर्गतः स्त्रीला जास्त दिल्याचे दिसते. कारण स्त्रीकडे ममत्व,जिव्हाळा आपुलकी, प्रेम, वात्सल्य, करूणा या स्त्री सुलभ भावना ईश्वराने पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त दिलेल्या आहेत. म्हणून तर आपल्या पूर्वजांनी या सणांमध्ये स्त्रीला महत्व दिल्याचे जाणवते .तसेच बुद्धीची देवता म्हणून गणपतीचे पूजन होते. कारण संसारामध्ये बुद्धी असेल तरच सर्व गोष्टी शक्य होतात.
गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल वर्णाची पार्वती भगवान शंकराची पत्नी.
श्रीसूक्त या ऋग्वेदाच्या खिल सूक्तात ज्येष्ठा म्हणजे काय याचे स्पष्ट उल्लेख आहेत –
ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्।अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्॥८॥
म्हणजे भूक, तहान आणि अस्वच्छता यांनी बरबटलेली ज्येष्ठा तिचा मला नाश करायचा आहे. काहीही न घडणारी, पुढे न सरकणारी,साकळलेली अवस्था म्हणजे अभूती आणि निर्धनता अर्थात असमृदधी यांना माझ्या घरातून नेहमीसाठी घालवून द्यायचे आहे (निर्णुद).
शेतीचा शोध लागण्या आधीची अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यानं संपन्न कांतिमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी.
हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबांत ज्येष्ठा आणि गौरीच्या बाजूला शंकरोबा, यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात.
ताटात मावणार नाहीत इतके अनेक पदार्थ तयार करून गौरी समोर ठेवण्याची परंपरा आहे. हे सुबत्ता आणि खाण्यातील रसिकता व समृद्धीचं प्रतिक आहे. अर्थात हे पदार्थ नेहमीच आपल्या घरी बनवावेत देवीला अर्पण करून आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावे हा उद्देश. पण आज मात्र यातील अनेक पदार्थ आपण बाहेरून विकत आणून ठेवतो. असो … पण जे देवासाठी ते देहासाठी असं म्हटलेलं आहे. अर्थात घरामध्ये नेहमीच चूल पेटलेली असावी हा या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन. पण आजची परिस्थिती पाहता घरातील चूल अर्थात किचन कट्टा काही दिवसांनी नष्ट होईल की काय अशी भीतीदायक परिस्थिती आहे.
कारण पूर्वी पुरुष मिळवून आणून देत असे आणि स्त्री त्याचे संवर्धन करून त्याचे नियोजन करून, आहार विहारा बरोबर इतरही संस्कार मुलांच्यावर करीत असे.
पण आज स्त्री घर सांभाळून, काहीवेळा गरज नसताना ही नोकरी करताना दिसते .त्यामुळे सहाजिकच तिचं किचनकडे दुर्लक्ष होत आहे.
पण या सर्वाचा समन्वय साधून गौरीच्या भाजी भाकरीच्या नैवेद्याला घरच्या लक्ष्मीचा हात लागून घरातील चूल अथवा गॅस कायम घरात चालू रहावा आणि घरच्या लक्ष्मीच्या हातचे संस्कारित सुग्रास भोजन घरामध्ये रोज ग्रहण करत या सणानिमित्ताने रोजच आनंद उत्सव साजरा करावा हे या सणामागील खरे विज्ञान अन्यथा नुसतेच कर्मकांड.
हेही वाचा : ‘गणेश चतुर्थी’ – शास्त्र काय सांगते?… तिथी, मुहूर्त आणि शंका जाणून घ्या
गौरीपूजन समज-गैरसमज
प्रश्न क्र. 1 : भाद्रपद महिन्यातील गौरी आवाहन,पूजन,विसर्जन याचे शास्त्र काय आहे?
उतर – गौरीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर केले जाते,पूजन जेष्ठावर आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. काही प्रांतात सप्तमीच्या दिवशी आवाहन,अष्टमीला पूजन,नवमीला विसर्जन केले जाते.
प्रश्न क्र. 1 : गौरी मंगळवारी किंवा शुक्रवारी या दिवशी विसर्जनाचा दिवस आला तर त्या दिवशी विसर्जन करू नये,असे म्हटले जाते.याला शास्त्राधार आहे का?
उत्तर – याला कोणताही शास्त्राधार नाही.गौरी विसर्जन शास्त्रानुसार मूळ नक्षत्रावर करायचे असल्याने मंगळवार किंवा शुक्रवार तसेच कोणत्याही वारी करता येते.
प्रश्न क्र. 2 : अनेक ठिकाणी गौरीचे पितळी किंवा शाडूचे दोन उत्सव मूर्ती म्हणून मुखवटे उभे करून, बाजूला घटावर/तांब्यावर तर,काही ठिकाणी वाटीतील खड्यावर ही गौरीचं पूजन केले जाते तर मी कशा पद्धतीने पूजन करू?
उत्तर – गौरी गणपती हे सण आपल्या भारतीय संस्कृतीतील पूजन आणि उत्सव प्रधान आहेत.उत्सवामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतं.याची अनुभूती पण नेहमीच या काळात घेत असतो.तरीही यातील पूजनाचा भाव महत्त्वाचा असला तरी आपल्या घरामध्ये जशी प्रथा असेल त्या पद्धतीने पूजन करावे.
प्रश्न क्र.3 : आमच्या घरी व्यक्तीचे निधन होऊन अजून एक वर्ष ही झाले नाही तर आम्ही गौरी बसवू शकतो काय?
उत्तर – काहीही हरकत नाही बसवू शकता फक्त आरास पंचपक्वान्न इत्यादी न करता साध्या पद्धतीने पूजन करावे.फक्त त्याला उत्सवाचे स्वरूप देवू नये.
प्रश्न क्र. 4 : पूर्वी फार मोठ्या पद्धतीची आरास करून गौरी बसवत होते पण वयोमानुसार आता मला जमत नाही.मी कशा पद्धतीने पूजन करू?
उत्तर – आपणास गौरीचे मुखवटे तांब्यावर ठेवूनही पूजन करता येईल.अनेक भाज्या,कोशिंबिरी,पंचपक्वान्न इत्यादी न करता एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून करून दाखवता येईल.
प्रश्न क्र. 5 : मला गौरीचे मुखवटे बसवायचे आहेत.माहेरकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून घ्यायचे असतात असे मी ऐकले याला शास्त्राधार आहे का?
उत्तर – असे कोणतेही शास्त्र नाही.खरं तर गौरीचे मुखवटे आपणच घेऊन त्याचं पूजन करणे योग्य होईल. कारण काही रुढी प्रथा गैरसमजातून तशाच पुढे चालू राहतात.
प्रश्न क्र. 6 : गौरीचे दोन मुखवटे बसवले जातात या पाठीमागची भूमिका काय?
उत्तर – यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते.तर काही जणांकडे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा गोरी आणि कनिष्ठा लक्ष्मी भगिनींनीची पूजा केली जाते.
खरं तर ही पूजा सोळा दिवस करायची असते आणि रोज एक दोरा पूजेत घ्यायचा असतो. मात्र सध्याच्या काळात जेष्ठा नक्षत्रावर सोळा दिवसाचे प्रतीक म्हणून 16 गाठी मारलेला दोरा घेऊन नंतर तो दुसऱ्या दिवशी हातात बांधतात.
प्रश्न क्र . 7 : काही कारणामुळे मला भाद्रपदात गौरी पूजन करता आले नाही तर पुढे अश्विन महिन्यात नवरात्रात राहिलेले गौरी पूजन करता येईल का?
उत्तर – याला कोणताही शास्त्राधार नसल्यामुळे तसे करू नये.
प्रश्न क्र. 8 : मला गौरी गणपती उत्सवाची फारच आवड आहे.पण त्या दिवशी मासिक धर्माची अडचण आहे.तर मी गौरी गणपती बसू शकते का?
उत्तर – खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीचे महत्व अनन्य साधारण आहे.तिला जगद् माता/जगद्जननी असे म्हटले आहे.पूर्वी तिला आय.सी.यू सारखी विश्रांती मिळावी हा त्या पाठीमागील उद्देश होता.तर धर्मसंकट प्रसंगी रोज पाण्यात गोमूत्र/तुळशीचे पान टाकून स्नान करावे.पळीभर गोमूत्र प्राशन करून पूजन करू शकता. असे विचार 21 व्या शतकातील काल सुसंगत आचारधर्म या ग्रंथात दाते पंचांग कर्त्यांनी मांडले आहेत.
प्रश्न क्र .8) आमच्या घरामध्ये गौरीचे पूजन आमच्या सासूबाई करत होत्या आता सासूबाई हयात नाहीत . .मला गौरी पूजेची आवड नाही , पण फक्त रूढी प्रथा आणि भीती पोटी मी गौरीचे पूजन करणे योग्य आहे का?
उत्तर : गौरी पूजन ही गोष्ट तर भीतीपोटी करण्यासारखी तर अजिबातच नाही पण आपल्या घरातील चांगल्या रूढी , परंपरा पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे .पण मनात नसताना एखादी गोष्ट करणे पूर्णतः चुकीचे आहे . पूजा ,जप ,ध्यान या गोष्टी देवासाठी नसून तुमच्यासाठी आहेत .सर्व गोष्टी मानसिक पातळीवर आहेत .जसजसं या गोष्टी तुम्ही करत राहाल त्या वेळेला तुम्हाला त्यातील आनंदाची अनुभूती येत राहील आणि जर अनुभूती नाही आली तर आपण गौरी बसू नयेत त्याचा कोणताही दोष तुम्हांला लागणार नाही कारण, देवपूजा अशी गोष्ट आहे की मानसिक पातळीवरची असल्यामुळे झाला तर त्याचा फायदाच होईल तोटा तर नक्कीच होणार नाही.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more
















































































