Last Updated on 29 Nov 2024 8:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गोंदिया । गोंदिया जिल्ह्यात, सडक अर्जुनी गावाजवळ शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे २३ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना २ लाखाची मदत जाहीर केली आहे तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली आहे.
जखमींवर गोंदिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना टोलनाक्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री यांच्याकडून मदतीची घोषणा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या दु:खद घटनेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर नमूद केले आहे की, महाराष्ट्रात गोंदिया येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असून मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.









































































