Last Updated on 04 Sep 2025 8:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । जीएसटी परिषदेच्या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. चार स्तरीय रचना रद्द करण्यात आली असून द्विस्तरीय रचना अमलात आणली जाणार आहे. 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब वगळण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून 22 सप्टेंबर 2025 पासून 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन स्लॅब असणार आहेत. या निर्णयामुळे कपडे आणि पादत्राणे, सायकली, दुचाकी, छोटी वाहने, बसेस आणि ट्रक, औषधे, चष्मे, आरोग्य विमा तसेच आयुर्विमा स्वस्त होणार असून सर्वासामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी रचना आणखी सुटसुटीत आणि सुलभ होणार आहे.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 56 वी बैठक नवी दिल्ली इथे पार पडली. या बैठकीत वस्तू आणि सेवा कर (GST) कराच्या दरातील बदल, व्यक्तींना, सामान्य माणसांना, महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीयांना दिलासा देणार्या तसेच वस्तू आणि सेवा कराअंतर्गत (GST) व्यापारातील सुलभतेविषयक उपाययोजनांसंबंधी शिफारशी करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात जीएसटी आकारणी सुलभ करण्याचे संकेत दिले होते. संसद सभागृहातही त्याचा पुनरूच्चार करण्यात आला होता. आणि परिषदेच्या बैठकीत त्याची फलश्रुती झाली. दोन स्तरीय आकारणीमुळे हजारो कोटींच्या महसूलाला सरकारला मुकावे लागणार आहे, मात्र त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.
हे बदल होणार, ‘या’ वस्तू स्वस्त होणार…
सामान्य माणूस, कामगार-केंद्रित उद्योग, शेतकरी आणि शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी परिषदेने दरांचे सुसूत्रीकरण करण्याला मंजुरी दिली. सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक आयुर्विमा पॉलिसी, टर्म लाइफ, युलिप किंवा एंडोमेंट पॉलिसी आणि रिइन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट दिली आहे.
सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी (फॅमिली फ्लोटर पॉलिसी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींसह) आणि त्यांचे रिइन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट दिली आहे.
सध्याच्या चार-स्तरीय कर दर रचनेचे नागरिक-स्नेही ‘सोपा कर’ मध्ये सुसूत्रीकरण – 18 टक्के स्टॅण्डर्ड दर आणि 5 टक्के मेरिट दरासह 2 दराची रचना असेल ; काही निवडक वस्तू आणि सेवांसाठी 40 टक्के विशेष डी-मेरिट दर.
जीएसटी 18 टक्के किंवा 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला, ज्यामुळे केसांचे तेल, टॉयलेट सोप, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर, किचनवेअर आणि इतर घरगुती वस्तू यांसारख्या सर्वसामान्य माणसाच्या वापरातील वस्तूंवरील कर कमी झाला.
अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध, पॅकबंद आणि लेबल केलेले पनीर यांसारख्या काही वस्तूंवरील जीएसटी 5 टक्के वरून शून्य (NIL) करण्यात आला आहे.
सर्व भारतीय ब्रेड प्रकारांवरील (चपाती किंवा रोटी, पराठा, इत्यादी) जीएसटी शून्य करण्यात आला आहे.
जीएसटी 12 टक्के किंवा 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे जवळजवळ सर्व खाद्यपदार्थांवरील म्हणजे पॅकबंद नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, संरक्षित मांस, कॉर्नफ्लेक्स, बटर, तूप, इत्यादीवरील कर कमी झाला.
एअर-कंडिशनिंग मशीन, 32 इंचा पर्यंतचे टीव्ही (सर्व टीव्ही आता 18% मध्ये), डिशवॉशिंग मशीन, लहान कार, 350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर, माती तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी कृषी, फलोत्पादन किंवा वनीकरण यंत्रसामग्री, कापणी किंवा मळणीची यंत्रसामग्री, ज्यात गवत किंवा चारा गठ्ठा तयार करणारे, गवत किंवा गवत कापणी करणारे, खत तयार करणारे यंत्र इत्यादींचा समावेश असलेल्या कृषी वस्तूंवरील जीएसटी 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे.
हस्तकला, मार्बल आणि ट्रॅव्हर्टाइन ब्लॉक्स, ग्रॅनाइट ब्लॉक्स आणि इंटरमीडिएट लेदर वस्तू यांसारख्या श्रम-केंद्रित वस्तूंवरील जीएसटी 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे.
सिमेंटवरील जीएसटीमध्ये 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत कपात
33 जीवरक्षक द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटी 12 टक्के वरून शून्य तर कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 जीवरक्षक द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटी टक्के वरून शून्य.
इतर सर्व द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटीमध्ये 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कपात
वैद्यकीय, शस्त्रक्रिया, दंत किंवा पशुवैद्यकीय वापरासाठी किंवा भौतिक किंवा रासायनिक विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साधने आणि उपकरणांवरील जीएसटीमध्ये 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कपात
विविध वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा उपकरणांवरील जीएसटी 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी जसे की वॅडिंग गॉझ, बँडेज, डायग्नोस्टिक किट आणि अभिकर्मक, रक्तातील ग्लुकोज देखरेख प्रणाली (ग्लूकोमीटर) वैद्यकीय उपकरणे इत्यादी.
350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या मोटारी आणि मोटारसायकलींवरील जीएसटीमध्ये 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत कपात
बस, ट्रक, रुग्णवाहिका इत्यादींवरच्या जीएसटीत 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत घट
कोणताही एचएस कोड असलेल्या मोटारगाड्यांच्या सर्व घटकांसाठी 18 टक्के चा एकसमान दर; तीन चाकी वाहनांसाठी 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत कपात
मानवनिर्मित फायबरवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करून तसेच मानवनिर्मित धाग्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करून मानवनिर्मित वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रलंबित उलट्या कर रचनेच (inverted duty structure) दुरुस्ती केली.
सल्फरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड आणि अमोनियावरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करून खत क्षेत्रातील उलट्या कर रचनेत (inverted duty structure) दुरुस्त केली.
नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवर आणि या उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या सुट्या भागांवरचा वस्तू आणि सेवा कर (GST) 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी केला.
प्रति युनिट प्रति दिन 7,500 रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या हॉटेल निवास सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 12 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी केला.
व्यायामशाळा, सलून, योगा केंद्रे इत्यादींच्या सेवांसह सामान्य व्यक्तींद्वारा वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी केला.














































































