Last Updated on 18 Aug 2025 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | जिल्ह्यात दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने व शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व सूचनांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी निर्गमित केले आहेत.
आदेशातील सूचनांची कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात संबंधित आयुक्त तसेच नगर पालिका व ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
आदेशात म्हटले आहे कि, सदरचे नियम सर्व जाती धर्माच्या उत्सवांना व प्रार्थना स्थळांना लागू राहतील. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सवापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अखत्यारीतील कामे पार पाडताना घ्यावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच, पूर्वपरवानगीशिवाय ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्यात येणार नाही. तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणारे मंडप व तत्सम रचना जवळ वा त्या ठिकाणी जाहिरात फलक, फ्लेक्स पूर्वपरवानगी शिवाय लावण्यात येऊ नयेत, रस्त्यावर व पादचारी मार्ग खोदण्यात येऊ नयेत, या अटी तात्पुरत्या स्वरूपात मंडप व तत्सम रचना उभारण्यासाठी परवानगी देतेवेळी स्पष्टपणे परवानगी पत्रात नमूद करण्यात याव्यात. ध्वनीप्रदूषण नियमामधील परिशिष्टात नमूद ध्वनी प्रदूषण विषयक विहित मर्यादा पातळीचे निकष वेळेसह परवानगी पत्रात नमूद करून त्याच्या पालनाची अट समाविष्ट करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आल आहे.
या आदेशात म्हटले आहे कि, सण उत्सव काळात नगर पालिका व महानगर पालिका क्षेत्रात ध्वनीप्रदूषण नियमाच्या उल्लंघनाच्या तक्रारी संदर्भात तसेच तात्पुरत्या स्वरूपात / पदपथावर रचना उभारण्या संदर्भात तक्रार निवारण यंत्रणा सुरु करण्यात यावी. यासंदर्भातील प्रत्येक तक्रारीची, निनावी तक्रारीची देखील दखल घ्यावी. महानगरपालिकांनी व नगरपालिकांनी प्रचलित /पारंपरिक पद्धतीशिवाय टोल फ्री क्रमांक, ई-मेल, लघुसंदेश व व्हॅटसअॅप व्दारे देखील तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दयावी. तक्रार नोंदवही तयार करुन तक्रारदारास तक्रार क्रमांक उपलब्ध करुन द्यावा. तक्रार नोंदवहीत केलेल्या कार्यवाहीची माहिती नमूद करावी. तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या / महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी.
ध्वनीप्रदूषणाकरिता तक्रारीसाठी नियुक्त यंत्रणेचे नाव, दूरध्वनी क्रमांक, इत्यादी माहितीस ध्वनीप्रदूषण नियंत्रणाकरिता प्राधिकृत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी व सदर माहिती शासकीय संकेतस्थळावर, प्रभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करावी.
संबंधितांच्या बैठका आयोजित करून ध्वनी प्रदूषण कायदेविषयक आणि पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याबाबतच्या नियमांची माहिती व कायदेशीर तरतुदी, नियमभंगाचे परिणाम या बाबतची माहिती देऊन आवश्यकतेनुसार स्थानिक रस्त्यावर, पदपथावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याबाबतच्या व ध्वनि प्रदूषण विषयक नियमांचे पालन करणे बाबत संबंधितांना सूचित करावे. तसेच, पूर्वपरवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्वरुपातील मंडप, कमानी व तत्सम रचना तातडीने निष्काषित कराव्यात. नियुक्त तपासणी पथकांनी गणेशोत्सव सणाच्या सात दिवस पूर्वी महानगरपालिका क्षेत्रात संबंधित ठिकाणी नियमितपणे भेटी द्याव्यात.
संबंधित प्राधिकाऱ्यांनी परवानगी देताना वाजवीरित्या पदपथ, रस्ते, पादचारी मार्ग नागरिकांना अडथळाविरहित राहतील याची खबरदारी घ्यावी. हेलिपॅड तयार करण्यासाठी परवानगी विषयक अर्जावर विचार करतांना प्रस्तावित हेलिपॅडच्या ठिकाणी संभाव्य ध्वनीप्रदूषणाची पातळी विचारात घ्यावी.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Jan 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन... Read more
















































































