Last Updated on 02 Jan 2022 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आपण लहानपणापासून सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषणे केली,निबंध लिहिले, पण त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर ‘क्रांतीज्योती’ ही उपाधी त्यांना का मिळाली हे कळेल.त्यांनी समाजात क्रांती (बदल )घडवून आणण्याचे काम ध्येयानिशी पूर्ण केले.हे आपल्याला माहितच आहे. पण त्यांनी स्त्रियांसाठी ज्ञान ज्योत पेटवली त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिविचारांना अभिवादन करून,
सावित्रीबाई फुले यांचे विचार समस्त महिला वर्गापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करीत आहे.
बुरसटलेल्या कल्पना, अज्ञान आणि अनिष्ट विचारांचाची समाजव्यवस्था अशा अंधाऱ्या कालखंडात सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे-पाटील असे होते.
त्या काळी आपला समाज अंधार्या युगात वावरत होता. लोक ज्ञानापासून वंचित होते. तर स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते. स्त्रियांची अवस्था खूपच दयनीय, फक्त चूल आणि मूल सांभाळणे. अशा या अंधारमय कालखंडात एखाद्या साध्वीने जन्म घ्यावा आणि आपल्या कार्याने समाजाला प्रकाशाकडे घेऊन जावे अशा त्या काळातील स्त्रियांना वाटत होते. स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी एका क्रांतीज्योतीचा जन्म झाला.
खंडाळा तालुक्यातील नायगाव या छोट्याशा खेडेगावात एक बालिका जन्माला आली. खंडोजी नेवसे-पाटील यांनी आपल्या मुलीचे नाव सावित्री असे ठेवले. या गावात मोजकीच घरे आणि लोक नावानिशी एकमेकांना ओळखत. कठीण प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. नेवसे-पाटील हे एक गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. गावचे पाटील म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत. तर सावित्रीबाई पाटलांच्या कन्या म्हणून लोकांना त्यांचे विशेष कौतुक होते. अशा वातावरणात सावित्रीबाई लहानाच्या मोठया होत होत्या. सावित्रीबाई चार वर्षांच्या झाल्या त्यांना आता समज येऊ लागली. वय जरी लहान असले तरी त्या चौकस बुद्धीच्या होत्या. एखादी नवीन गोष्ट पाहिली की त्याबद्दल आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत.
मुलगी दिवसामाजी मोठी होत असताना वडिलांनी वरसंशोधनाचे काम सुरू केले. अखेर त्यांना पुण्यात राहणारे फुले कुटुंबीय की जे आपले नाव व आदब राखून असणारे पाहण्यात आले. ते फुलांचा व्यापार करायचे म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. अखेर सावित्रीबाई यांचा ज्योतिबा यांच्याशी विवाह निश्चित झाला. त्यावेळी सावित्रीबाईंचे वय अवघे ५ वर्ष होते तर जोतिबांचे वय ९ वर्ष होते. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचा विवाह पार पडला ते साल होतं १८४०. आता सावित्रीबाई ज्योतीबांच्या सौभाग्यवती बनून सासरी आल्या. पण हे घर त्यांना वेगळे वाटले नाही, की आपण परक्यांच्या घरी आलो असेही त्यांना वाटले नाही. सासरचे घर म्हणजे आपल्या आई-वडिलांचे जणू दुसरे घर अशीच त्यांच्या मनाची भावना झाली. त्या आपल्या पतींना शेटजी या नावाने संबोधायच्या.
जोतिबांना शिक्षणाची खूप आवड होती .जोतिबा वाचन करीत असताना सावित्रीबाई ऐकत असत. ते सावित्रीबाईंना कर्तुत्वान माणसांची चरित्र वाचून दाखवत. शिवाजी महाराज, वॉशिंग्टन यांचे फोटो दाखवून त्यांना त्यांच्या कार्याची महती सांगत. म्हणूनच ज्योतिबा फुले हे पुढे जाऊन महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, संपादक, क्रांतिकारक झाले. म्हणून त्यांना महात्मा अशी उपाधी मिळाली.
आता सावित्रीबाई सुद्धा शिकू लागल्या, लिहू लागल्या. ‘स्त्री हा घराचा पाया आहे, तिचे शिक्षण झाले तर सारे घर सुधारते हे जोतिबांचे विचार. आपल्या पतीच्या आचार विचारांनी सावित्रीबाई पुरत्या भारावून गेल्या. पतीच्या वाटचालीत मनापासून साथ देऊ लागल्या.
दोघांचेही एकच ध्येय होते आणि ते म्हणजे माणसा-माणसातील भेदभाव दूर करून सर्वांना शिक्षण देणे. जोतिबांनी तर जणू तशी प्रतिज्ञाच केली.
काही लोकांनी स्वार्थासाठी अनिष्ट रुढी , कल्पना , चालीरीती समाजात पसरवल्या. ह्या खुळचट कल्पना प्रगतीला अडथळा आणतात. माणसा-माणसांत भेदभावाची भावना निर्माण करतात, अशा कल्पना मोडून काढायला हव्यात. यासाठी जोतिबा व सावित्रीबाईनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली .तर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या.
सुरुवातीला सावित्रीबाईंच्या शाळेत सहा मुली होत्या.१८४८ नंतर ४०-४५ अशी पटसंख्या वाढीस लागली. लोकांचा विरोध असूनही त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा वसा हाती घेतला. अंगावर चिखलाचे गोळे फेकले तरी त्यांनी कधी हार मानली नाही. कितीही कष्ट पडले, अपमान झाला तरी चालेल पण स्त्रियांना, मुलींना शिकवण्याचं काम देव आज्ञेनेच पूर्ण केले त्यांनी कनिष्ठ वर्गातील स्त्रियांना देखील शिक्षणाचे धडे दिले.
स्त्री शिक्षणाबरोबरच अन्य क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. स्त्रियांना त्या आत्मविश्वास देऊ लागल्या. बाल विवाह झालेल्या मुली तरुण वयातच विधवा होत असत. तर ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाहास अजिबात मान्यता नव्हती. त्यामुळे अशा स्त्रियांना पतीच्या मृत्यूनंतर सती जावे लागे. म्हणून सावित्रीबाईंनी सतीबंदी, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. फुले यांनी सुरू केलेल्या बालहत्या प्रतिबंध ग्रहातील विधवा स्त्रियांची मुले व मुली यांचा त्या आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत. अशाच एका विधवा स्त्रीचे मुल ज्योतिबा व सावित्रीबाईंनी दत्तक घेतले व त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून आपले नाव दिले. हे मुल मोठे होऊन यशवंत फुले या नावाने ओळखू लागले.
नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन केले व केशवपन पद्धती बंद केली. पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. जाचक ,रूढी परंपरा, चालीरीतींचा त्याग करून माणसांनी माणसासारखे राहावे, वागावे माणुसकीचा धर्म पाळावा अशी त्यांनी समाजाला शिकवण दिली. सावित्रीबाईं आपल्या पतीच्या मानवतेच्या कामात कुठेही मागे राहिल्या नाहीत. त्यांनी आपल्या पतीला मोलाची साथ दिली म्हणूनच मानवतेचे पुजारी ज्योतिबा महात्मा म्हणून ओळखू लागले.
दोघां पती-पत्नीने खूप कष्ट करून, परिश्रम घेऊन जगाला माणुसकीच्या धर्माची शिकवण दिली. हे आचरण समाज जागृतीचे महान कार्य ठरले.
सावित्रीबाईंनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्यातून ही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह लिहून समाज प्रबोधन केले.
१८९६ मध्ये पडलेल्या दुष्काळात पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांना दुष्ट लोकांच्या तावडीतून सोडवून सत्यशोधक कुटुंबांत आश्रय दिला. त्यांच्या कार्याला हातभार लावणाऱ्या अनेक स्त्रिया जन्माला आल्या.
१८९६-९७ मध्ये पुण्यात प्लेग साथ पसरली. हा भयानक रोग पसरू लागला तेंव्हा दवाखान्यात रुग्णांची सेवा केली हि रुग्णसेवा करताना सावित्रीबाईंना देखील प्लेगची लागण झाली. अखेर १० मार्च १८९७ मध्ये सावित्रीबाईंचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत सावित्रीबाईंनी समाजाची सेवा केली. म्हणून त्या क्रांतीज्योती एक महान साध्वी म्हणून नावारूपाला आल्या. समाजसेवेची अखंड तेवत ठेवणारी ज्योत त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!
आज 3 जानेवारी त्यांच्या या जन्मदिनी महिला मुक्तीदिन व बालिकादिन म्हणून आपण साजरा करतो.आज दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबांईच्या विचारांचा व कार्याचा प्रसार व्हावा म्हणून ही सावित्रीची लेक मोजक्या शब्दांत त्यांचे कार्य सर्व स्त्रीशक्तीला समर्पित करते.

शब्दांकन: सौ स्वाती धनराज जंगम.
(नागांव) कोल्हापूर.
टोपण नाव :(स्वाती धन)
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी











































































