Last Updated on 16 Jul 2025 8:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आज (बुधवारी) दुपारी १२ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुट उघडून 8000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
कोयना धरणातील आजचा पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणामध्ये येणारा येवा आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे.
आज दि. 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुट उघडून 8000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 10100 क्युसेक विसर्ग सुरू होईल.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 44 मिलिमीटर, नवजाला 84 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 131 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी 16 जुलै 2025 सकाळी 8 पर्यंतची आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 374 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 286 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 349 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 77.26 टीएमसी इतका झाला असून धरण 73.41टक्के भरले आहे. कोयना धरणात प्रति सेकंद 26,408 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.









































































