Last Updated on 02 Oct 2021 2:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.नैसर्गिक वायू सीएनजी इंधन बनवण्यासाठी वापरला जातो.त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांच्या खिशावर आणि त्यांच्या आर्थिक गणितांवर पडण्याची शक्यता आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबर अर्थात आजपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी लागू होणार आहे.
केंद्राने नैसर्गिक वायूचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दहा लाख ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर इतके असणार आहेत. हा नैसर्गिक वायू विशेषत: सीएनजी आणि मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या घरगुती गॅसच्या निर्मितीमध्ये वापरला जातो.त्यामुळे नैसर्गिक वायू दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक वायूच्या दरवाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपद्वारे मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, या दरवाढीमुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल, मात्र वायूपासून तयार होणाऱ्या विजेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्याची फारशी झळ पोहोचणार नाही. तसेच, खतांच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे.















































































