Last Updated on 21 May 2025 7:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बाहेर मस्त पाऊस पडत असेल आणि काहीतरी चमचमीत खायचे असेल तर…खूप ठिकाणी कांदा आणि बटाटा भजीचा बेत केला जातो.कुरकुरीत भजी बनवणे हे देखील एक स्किल आहे.भजी ही मस्त खुसखुशीत व्हायला हवी असते.त्यासाठी त्यात सोडा घालण्याची गरज असते असे नाही.त्यातल्या त्यात पावसाळ्यात जी कांदा भजी खावीशी वाटते ती म्हणजे खेकडा कांदा भजी.कारण ती खूपच कुरकुरीत आणि मस्त लागते.
पावसाला सुरूवात झाली आहे. मग काहीतरी चटपटीत बेत घरीच व्हायला हवा. अशातच गरमा गरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच आहे. चला तर मग ही भजी कशी करायची ते जाणून घेऊयात…
साहित्य –
1. कांदे – ३ ते ४
2. बेसन पीठ – अर्धी वाटी
3. तांदूळ पीठ – अर्धी वाटी
4. मीठ – १ ते १.५ चमचा
5. कोथिंबीर – बारीक चिरलेली अर्धी वाटी
6. ओवा – अर्धा चमचा
7. तिखट – अर्धा चमचा
8. हळद – पाव चमचा
9. तेल – २ वाट्या
10. पाणी – पाव वाटी
कृती –
1. सगळ्यात आधी कांदे चिरून ते मोकळे करुन त्यावर मीठ आणि कोथिंबीर घालून ते १५ ते २० मिनीटांसाठी बाजूला ठेवावेत.
2. बेसन आणि तांदूळ पीठ एकत्र करुन त्यात ओवा, मीठ, हळद आणि तिखट घालावे.
3. मीठ घालून ठेवल्याने कांद्याला चांगले पाणी सुटते. खेकडा भजी कुरकुरीत हवी असल्याने ती करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा.
4. एकत्र केलेले पीठ कांद्यावर वरुन घालावे आणि ते कांद्यांमध्ये हाताने एकत्र करावे.
5. जास्त पाणी न घालता अगदी थोडे पाणी वरुन भुरभुरावे. कांद्याचे काप मुठीने वळले जातील इतकेच पाणी वापरावे. म्हणजे भज्यांचा कुरकुरीतपणा चांगला राहतो.
टिप्स –
1. खेकडा भजी करताना पाण्याचा अतिशय कमीत कमी वापर करायचा.त्यामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते.
2. कांदा मध्यभागी कापल्यावर उभे काप देण्याऐवजी आडवे काप द्यायचे, म्हणजे ते काप जास्त मोठे, पातळ आणि लवकर सुटे होतात.
3. पूर्ण बेसन पीठ वापरण्याऐवजी अर्धे बेसन आणि अर्धे तांदूळ पीठ वापरावे. त्यामुळे भजी जास्त काळ कुरकुरीत राहतात.
4. बेसन पीठाचा त्रास होत असेल किंवा घरात उपलब्ध नसेल तर भजी तळण्यासाठी आपण बेसनाशिवाय मूगाच्या डाळीचे पीठ, तांदूळ पीठ किंवा कॉर्न फ्लोअरचा वापर करु शकतो.
5. भजी खूप तेल पिऊ नयेत यासाठी सुरूवातीला गॅस तापवून घ्यावा पण नंतर ती मंद आचेवर तळावीत. याशिवाय बाहेर सोडा घातल्याने ती भजी जास्त तेलकट होतात. घरात आपण शक्यतो सोड्याचा वापर टाळावा.
ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोड्याने भजी तेलकट होतात.












































































