Last Updated on 30 May 2023 7:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
चंद्रपूर । गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे.ते 48 वर्षांचे होते.चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते.पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते.तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते.मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या.त्यामुळे ते सुखरूप परत येतील,अशी सर्वांना आशा होती.मात्र आज रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा,दोन मुले असा परिवार आहे.
बाळ धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते.चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते.पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.दुसरीकडे,एक युवा नेता अकाली गेल्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली.2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता.त्यांच्या रूपाने काँग्रेसला महाराष्ट्रात खाते उघडता आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव.लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले.2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते.विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.







































































