Last Updated on 14 Jun 2023 5:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानास विद्यार्थी,पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली । ‘आजचा विद्यार्थी जागरूक, चौकस असून योग्य दिशेने वाटचाल केल्यास करिअरची निवड खूप सोपी व सहज होऊ शकते.’ असे मत प्रसिद्ध लेखक व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.
श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्यावतीने दहावी व बारावीनंतर शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित ‘उज्वल करिअरचा राजमार्ग’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानानिमित्त ते बोलत होते.उच्च शिक्षणाच्या साचेबद्ध अभ्यासक्रमापेक्षा करिअरच्या अनोख्या क्षेत्राची वाट कशी शोधावी? याबाबत श्री.वेलणकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सम्राटबाबा महाडिक,श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा.श्री महेश जोशी, गटशिक्षणाधिकारी श्री.अजिंक्य कुंभार, शिक्षणविस्तार अधिकारी श्री.सुनील आंबी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री सुभाष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. करिअर निवडीविषयक विविध शंकांचे निरसन करताना श्री वेलणकर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
‘दहावी,बारावी परीक्षांच्या निकालानंतर करिअर निवडीच्या निर्णयाक क्षणी आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग नक्कीच सापडेल.’ असा विश्वास श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री सम्राटबाबा महाडिक यांनी व्यक्त केला.
श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा.श्री. महेश जोशी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत असताना म्हणाले, ” सुयोग्य करिअरची निवड एक महत्त्वाचा टप्पा असून योग्य माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची आवड बघून जाणीवपूर्वक निवडलेले करिअर विद्यार्थ्यांना अमर्याद संधी उपलब्ध करून देते”
शालांत परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.करिअर निवडीच्या योग्य वेळी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी एस वर्मा, श्री.राहुल चिटणीस, प्रा.सी.बी.पाटील व्ही.ए .कापसे, प्रा आदर्श पाटील, श्री. सतीश जाधव उपस्थित होते. व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ.संतोष वाडकर यांनी आभार मानले.








































































