Last Updated on 20 May 2023 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा इशारा
नांदेड । कंत्राटदारांनी काम व्यवस्थित न केल्यास बडतर्फीसह कठोर कारवाईचा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.यासंदर्भातल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई केल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपिठावरून ते बोलत होते. यावेळी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर , माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते.तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते.शेगाव, शिर्डी,तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्यादृष्टिने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. माहूर येथे वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी मोठा तलावही उपलब्ध आहे. सर्वांच्या प्रयत्नातून याठिकाणी तलावातील पाण्याची पातळी चार मीटर पेक्षा अधिक आपण आणू शकलो तर या विस्तारीत तलावाच्या पाण्यावर प्रवाशी विमानसेवाही आपण उपलब्ध करू असा दुर्दम्य आत्मविश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखविला. या भागाला अनेक जैवविविधता लाभलेली आहे. येथील सत्व लक्षात घेता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान 3 हजार झाडे लावावीत व याचबरोबर माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन तरी झाडे लावावीत, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ते म्हणाले,देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये काही ठिकाणी कंत्राटदारांचे अतीशय वाईट अनुभव येतात यात नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या काम करणाऱ्या काही कंत्राटदारांचाही समावेश आहे.नांदेड-किनवट मार्गातील इस्लापूर येथील पुलाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत.किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही यासंदर्भात जाहीर तक्रार केली आहे.याची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर बडतर्फीची कारवाई आहे.काम व्यवस्थीत झाले नाही तर आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची पाऊले उचल्याशिवाय राहणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन निमित्त कोनशिलेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले.श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांना व भूमिपूजन समारंभाला शुभेच्छा दिल्या.









































































