Last Updated on 16 Sep 2023 1:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात अनावरण
छत्रपती संभाजीनगर,धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे अनावरण
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय…या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले.स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग,जिल्हा,तालुका,गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला.
शहरानंतर आता जिल्ह्याचंही नामांतर; ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’वर शिक्कामोर्तब
दरम्यान,राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे.त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे.सरकारने राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहेत.त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.









































































