Last Updated on 16 Sep 2021 5:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बाऊंड्री लाईनजवळ कॅच : आयसीसीने शेअर केला व्हिडिओ

ओमान संघाविरुद्ध CWC लीग 2 सामन्यात नेपाळच्या रोहित पौडेलने एक अविश्वसनीय झेल पकडला आहे, ज्याच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ओमानच्या जतिंदर सिंहने स्लोवर चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न फसला आणि बाउंड्री लाईनवर रोहितने चपळता दाखवत, डाव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम झेल पकडला.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 सुरू झाली आहे. ही सीरिज ओमान, नेपाळ आणि अमेरिका यांच्यात खेळली जात आहे. लीगच्या दुसऱ्या सामन्यात ओमानने नेपाळचा 5 गडी राखून पराभव केला. नेपाळला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, पण संघातील खेळाडू सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी झाले. सामन्यात नेपाळच्या रोहित पौडेलने असा झेल पकडला, ज्याचे आयसीसीनेसुद्धा केले आहे.
व्हायरल झाला रोहितचा झेल
नेपाळ आणि ओमान यांच्यात पार पडलेल्या सामन्यात नेपाळ रोहित पौडेल याने सीमारेषेजवळ हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. ओमानच्या फलंदाजीदरम्यान, 26व्या षटकात कुशल मल्ला याचा तिसरा चेंडू जतिंदर सिंह याने लॉग ऑनच्या दिशेने जोरात टोलावला. जतिंदरने मारलेला फटका पाहता, चेंडू सहजपणे सीमारेषेबाहेर जाणार असे सर्वांना वाटत होते. पण रोहित हवेत झेप घेत तो चेंडू पकडून सर्वांना आश्चर्यचकित केले.
रोहित धावत जाऊन सीमारेषेजवळ पोहचला आणि त्याने हवेत सूर मारत एका हाताने चेंडू झेलला, अशात त्याचा तोल सीमारेषेबाहेर जात होता. तेव्हा त्याने चेंडू सीमारेषेच्या आत हवेत फेकला. नंतर सीमारेषेबाहेर जाऊन परत सीमारेषेच्या आत येत तो चेंडू पकडला. यासह जतिंदर सिंगची 107 धावांची खेळी संपुष्टात आली.
रोहितने जतिंदरचा अप्रतिम झेल पकडला परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. नेपाळने प्रथम फलंदाजी करताने ओमानसमोर 197 धावांचे आव्हान ठेवले होते. ओमानने हे लक्ष्य 5 गड्याचा मोबदल्यात सहज पूर्ण केले. यात जतिंदर सिंहने 62 चेंडूत 107 धावांची खेळी केली. या विजयासह ओमानने क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या पाँईट टेबलमध्ये 11 पैकी 9 सामन्यात विजय मिळवत पहिले स्थान पटकावले.











































































