Last Updated on 19 Oct 2022 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । यावर्षी आपल्या मागण्यांसाठी मोठा संघर्ष करणाऱ्याएसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
यासाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे 87 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला होणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.










































































