Last Updated on 21 May 2025 8:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सभासद संपर्क दौऱ्याचा शुभारंभ, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली । आपण राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच आरोग्य व आपल्या मुलांच्या शिक्षणा साठी विविध सोई-सुविधा सुरू केल्या आहेत. आपण कारखान्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले एकरी उत्पादन वाढवावे,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी सभासद संपर्क दौऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले.
प्रतीक पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी माणिकवाडी,महादेववाडी या गावातून सभासद संपर्क दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष, कारखान्याचे संचालक देवराज पाटील, संचालक अतुल पाटील,सचिव डी.एम. पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील, गटाधिकारी नितीन पाटील सहभागी झाले होते. भर पावसातही ऊस उत्पादक शेतकऱ्यां चा या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रतीक पाटील म्हणाले,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे,ही चिंतेची बाब आहे. पूर्वी प्रति हेक्टरी १०५ टन ऊसाचे उत्पादन येत होते. आता ते ८२ टनावर आले आहे. पूर्वी साखर कारखाना १६० दिवस चालत होता,आता तो १०० दिवसांवर आला आहे. आता आपणास कमी खर्चात ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपण लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना सातत्याने प्रेम आणि साथ दिली आहे. आपल्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याकडूनही साथ मिळावी.
देवराज पाटील म्हणाले, प्रतीक पाटील यांच्यासह आम्ही आपल्या पेठ गटाचे प्रतिनिधित्व करीत आहोत. लोकनेते राजारामबापू पाटील यांची दूरदृष्टी, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे अथक परिश्रमातून आपली शिवारात पाणी आले आणि आपल्या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. यावेळी संचालक अतुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या दौऱ्यात ऊस उत्पादक सभासदांनी पाणंद रस्ते,ऊस तोडी व यंत्रणा आदी विविध मुद्द्यांवर अनेक प्रश्न,समस्या मांडल्या. प्रतीक पाटील यांनी हे प्रश्न समजून घेत ते सोडविण्याचे आश्वासन दिले.
वाटेगाव संयुक्त पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर,राजारामबापू बँकेचे संचालक नामदेव मोहिते,सरपंच वसंत शिंदे, पै.दिनकर शिंदे,शंकरराव जाधव,डी.जी. खोत,राजारामबापू दूध संघाचे संचालक संजय शिंदे,वसंतराव कदम,रामचंद्र मोहिते, अरुण कदम,बबनराव यादव,राजाराम यादव, जयकर कदम,प्रा.प्रदीप पाटील,माजी सरपंच वसंतराव कांबळे,विनायक कदम,उपसरपंच संदीप कदम,सचिन खोत,नायकलवाडीचे सरपंच सुनिल कचरे,मधुकर कचरे,माणिक नायकल,संभाजी नायकल,संजय नायकल यांच्यासह त्या-त्या गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.










































































