Last Updated on 06 Feb 2025 11:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे : उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते.
चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.
राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं फडनवीस म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या, खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत असून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे करणारे महायुतीतल्या घटक पक्षांचे लोक असतील तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी पिंपरी चिंचवडमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. याप्रसंगी विविध सायबर गुन्ह्यांमधे बळी पडलेल्या तक्रारदारांना आरोपींकडून हस्तगत केलेली रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परत केली गेली. तसंच फडनवीस यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या सायबर विभागातल्या पोलिसांचा सत्कार केला.














































































