Last Updated on 29 Nov 2025 5:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
☑️ आ. जयंत पाटील यांचा आत्मविश्वास : रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
☑️ ईश्वरपूर येथे आ. जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली
☑️ महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती; घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणला
☑️ नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार मोठ्या फरकाने जिंकतील, असा आ. पाटील यांचा दावा
☑️ “शहर आपणच दुरुस्त करायचं; बाहेरच्या लोकांची गरज नाही”

ईश्वरपूर । माजी मंत्री आ.जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, पक्षाचे सर्व उमेदवार, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निवडणुकीत १९८५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचा आत्मविश्वास आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळी ९ वाजता शहरातील झरी नाका येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. आझाद चौक, गणेश मंडई,बुरुड गल्ली, यल्लामा चौक, गांधी चौक, मणेर गल्ली, संभुआप्पा मठ, शिवाजी चौक, तानाजी चौकातून उदय चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. युवा कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात परिसर दणाणून सोडला.
या निवडणुकीत १९८५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार
आ.पाटील म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे दोन – तीन दिवस राहिले आहेत. संपूर्ण शहरात मतदारांचा आपणास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या निवडणुकीत १९८५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. उद्याच्या समोरच्या प्रचार सांगता सभेत घोषणांचा महापूर येईल,माझ्यावर प्रचंड प्रेम व्यक्त केले जाईल. मात्र आपण विचलित होऊ नका. आपले काम चालू ठेवा.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील,खंडेराव जाधव यांनी प्रचंड संख्येने आणि उत्साहाने रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे, विशेषतः महिला व युवकांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले. माजी नगराध्यक्षा प्रा. अरुणादेवी पाटील, पै भगवान पाटील, मुनीर पटवेकर, सुरेंद्रदादा पाटील, महेश पाटील, संग्राम दिलीपतात्या पाटील, एल.एन.शहा, पुष्पलता खरात, विजय कुंभार, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, संदीप पाटील, अरुण कांबळे, पिरअली पुणेकर, शंकरराव चव्हाण, शैलेश पाटील, अनिल पावणे, तसेच सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उद्या (रविवारी) सायंकाळी ६ वाजता यल्लामा चौकात जाहीर सभा
उद्या सायंकाळी ६ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस हलगी – घुमक्याच्या निनादात आपण सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी केले.
मी एकटाच पुरेसा…

आ.पाटील यावेळी म्हणाले, आपण उद्याच्या जाहीर सभेस बाहेरच्या कोणा पाहुण्याला बोलाविलेले नाही. आपणच पुरेसे आहोत. बाहेरचे लोक येतील, आश्वासने देतील आणि निघून जातील. शेवटी तुम्हाला आणि मलाच हे शहर दुरुस्त करायचे आहे.














































































