Last Updated on 21 Nov 2025 6:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आनंदराव मलगुंडे – विश्वनाथ डांगे यांच्यात चुरशीची लढत
प्रकाश बनसोडे/उरुण-ईश्वरपूर
उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मार्फत आनंदराव संभाजी मलगुंडे विरुद्ध युतीमधील भारतीय जनता पक्षाचे विश्वनाथ डांगे अशी थेट, सरळ, लक्षवेधी, उत्कंठावर्धक आणि चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरुण-ईश्वरपूर शहरावरील राजकीय वर्चस्वासाठी आ. जयंत पाटील विरुद्ध युतीचे आ. सदाभाऊ खोत, निशिकांत भोसले पाटील, चिमण डांगे, आनंदराव पवार, सम्राट व राहुल महाडीक, विक्रम पाटील यांचे सामूहिक नेतृत्व असा संघर्ष रंगला आहे. यापूर्वी आ. जयंत पाटील विरोधक शहर सुधार समिती, विकास आघाडी अशा आघाड्यांमार्फत लढत होते. मात्र या वर्षीच्या निवडणुकीत सर्वच गटातटांनी पक्षाला प्राधान्य दिले आहे. दीर्घ काळानंतर आघाड्यांऐवजी नगरपालिका निवडणुकीला पक्षीय स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील ६४ हजारहून अधिक मतदारांचा अनुनय सुरू आहे. सर्वांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
आ. जयंत पाटील गटाची रणनीती आणि प्रचार
आ. जयंत पाटील यांनी मतदारसंघावरील वर्चस्वासाठी उरुण ईश्वरपूर आणि आष्टा येथील निवडणुकीसाठी पूर्णवेळ दिला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रभागातील उमेदवार निश्चित करून प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांचे मोहोळ आ. जयंत पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांची प्रतिमा याचा आधार घेत घर टू घर जोरदार संपर्क मोहीम सुरू आहे.
प्रचाराचे प्रमुख मुद्दे:
या गटाकडून प्रचारासाठी शहराचा विकास, राजकीय गुन्हेगारीकरण आणि उमेदवारांची प्रतिमा या मुद्द्यांचा आधार घेतला जात आहे. २०१७ च्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा झालेला पराभव या गटाला वेदनादायक आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आ. जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी सज्ज झाले आहेत. आ. जयंत पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात शहरात झालेली विकासकामे आणि ही विकासकामे पुन्हा गतिमान करण्यासाठी आम्हाला संधी हवी असा सूर आहे. तर विरोधकांच्या काळात झालेल्या विकासकामांचा पंचनामा अधोरेखित करणारी पुस्तिका वाटप सुरू आहे. या गटामध्ये आ. जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा गतीने सुरू आहे. अखेरच्या क्षणी काँग्रेस या गटाबरोबर एकत्र यायला उत्सुक होती, मात्र काँग्रेसच्या गलथानपणामुळे ए. बी. फॉर्म वेळेत न आल्यामुळे काही काँग्रेसजनांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याचाच अर्थ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे आ. जयंत पाटील गट ही निवडणूक लढवत आहे.
युतीची निवडणूक व्यवस्थापन आणि आश्वासने
युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून विश्वनाथ डांगे यांच्या नावावर युतीमधील घटक पक्षांचे एकमत झाले. मात्र प्रभागनिहाय उमेदवार ठरवताना निशिकांत भोसले-पाटील, आनंदराव पवार, विक्रम पाटील, राहुल व सम्राट महाडीक या गटनेत्यांना आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी बैठकांवर बैठका घ्याव्या लागल्या. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम तारखेपर्यंत देखील काही प्रभागातील युती की बंडखोरी हा संभ्रम सुरूच होता. विश्वनाथ डांगे यांची उमेदवारी घोषित व्हायला वेळ झाला असला तरी भारतीय जनता पक्षा मार्फत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करणारे ते राज्यातील पहिले उमेदवार ठरले आहेत. युती धर्म म्हणून आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील रयत क्रांती संघटनेचे दोन उमेदवार शहरात पहिल्यांदा लढत देत आहेत. युतीकडे आ. जयंत पाटील यांच्यासारखेच तुल्यबळ निवडणूक व्यवस्थापन कौशल्य आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील युतीचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी शहर विकासासाठी काही योजना घोषित केल्या. भुयारी गटार योजना, २४x७ पाणीपुरवठा योजना यासाठी भरघोस निधीचे आश्वासन दिले आहे. केंद्र व राज्याच्या डबल इंजिन सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेत साथ हवी असा त्यांचा पवित्रा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीमुळे शहरात झालेली विकासकामे, इस्लामपूर शहराचे उरुण ईश्वरपूर असे नामांतर आणि आ. जयंत पाटील यांची कार्यशैली हे प्राथमिक टप्प्यात युतीच्या प्रचाराचे मुद्दे आहेत.
बहुमताचा ‘मॅजिक नंबर’ आणि बंडखोरी
शहरात १५ प्रभाग आहेत, ३० नगरसेवक निवडायचे आहेत. बहुमतासाठी १६ नगरसेवक हा मॅजिक नंबर आहे. भुयारी गटार आणि २४x७ पाणी योजना हे मुद्दे १५ वर्षे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादीच्या पंचनाम्याला युतीने राखठोक उत्तर देणारा एक अहवाल तयार केला आहे. या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीला आघाडी ऐवजी आलेले पक्षीय स्वरूप.
या निवडणुकीत आ. जयंत पाटील यांचे की युतीचे सामूहिक नेतृत्व जिंकणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. अलीकडे निवडणुका रस्त्याप्रमाणे सोशल मीडियावर देखील गाजत राहतात. त्याप्रमाणे ही निवडणूकही सोशल मीडियावर गाजत आहे. सर्वसामान्य मतदार मात्र ‘आमचे प्रश्न काल होते तेच आजही आहेत’ या भूमिकेत आहेत. मतदार राजा निमंत्रण येईल तेथे भोजनावळीला आवर्जून उपस्थित राहत आहे. एक गोष्ट नक्की नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
राज्य पातळीवर युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक होते. ईश्वरपूर शहरात अशीच निवडणूक होईल असे वाटत होते मात्र विकास आघाडीकडे काँग्रेसचे उमेदवार नाहीत. (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक शकील सय्यद हे युतीकडे गेले त्यामुळे विकास आघाडीत आ. जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष राहिला आहे. तुलनेने युतीमधील भ.ज.पा., शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), रयत क्रांती संघटना हे घटक पक्ष तत्त्वतः एकत्र राहिले. मात्र उमेदवारीसाठीच्या मारामाऱ्या सुरूच आहेत.
निवडणुकीपूर्वी झालेले पक्षांतर
२०२५ च्या या निवडणुकीत निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षांतर शहरात चर्चेत आहे. विजय कुंभार, महेश पाटील, एल.एन. शहा या युतीच्या नेत्यांनी आ. जयंत पाटील गटात प्रवेश करून उमेदवारी पटकावली. तर प्रतिभा पाटील, शकील सय्यद, प्रतिभा शिंदे या राष्ट्रवादी समर्थकांनी युतीकडे प्रवेश केला. शकील सय्यद आणि प्रतिभा पाटील यांना युतीतून उमेदवारी मिळाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरांना मतदार कसा प्रतिसाद देतात हा देखील उत्सुकतेचा विषय आहे. शहरातील ६४ हजार मतदारात ४ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. नगरपालिका प्रशासनामार्फत मतदार जागृती मोहीम सुरू आहे.









































































