Last Updated on 04 Mar 2024 7:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा इशारा
सांगली । पिंपरी-चिंचवड व सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या धर्तीवर इस्लामपूर शहरातील मालमत्ताधारकांचा शास्तीकर रद्द करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू,असा इशारा इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांना देण्यात आलेल्या निवेदन देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,जेष्ठ नेते बी.ए.पाटील, डॉ.संग्राम पाटील,सौ.संगीता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने २०१८ मध्ये एक शासन निर्णय पारित करून नगरपालिका,महानगर पालिका क्षेत्रात विना परवाना बांधकाम करणाऱ्यांना शास्तीकर लागू केला होता. त्या प्रमाणे ६०० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामास शास्तीकर लागू नाही. तर ६०० चौरस फुट ते १ हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामास संकलित कराच्या ५० टक्के,तसेच १ हजार चौरस फुटाच्यापुढील बांधकामास संकलित कराच्या दुप्पट शास्तीकर आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
उरूण-इस्लामपूर नगरपालिका ही ब वर्ग नगर पालिका असून हे शहर शैक्षणिक, वैद्यकीय व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एक महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्या मुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातून,तसेच राज्य व परराज्यातून या शहरात घरे बांधून स्थायिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रत्येक नागरिकाने आप-आपल्या आर्थिक कुवतीनुसार अर्धा,एक-दोन गुंठे जागा विकत घेऊन घरे बांधली आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची बहुतांश आर्थिक पुंजी खर्च केली आहे. हे सर्व मालमत्ताधारक अल्प उत्पन्न व मध्यमवर्गीय कुटूंबातील असून तत्कालीन परिस्थितीत गुंठेवारी क्षेत्र व त्यामधील बांधकामे ही गरजेप्रमाणे बांधली गेली असल्याने ,त्यातील बहुतांश बांधकामांना सद्य परिस्थितीत नगरपालिकेकडून बांधकाम परवाने मिळविताना अडचणी येत आहेत. ज्या सर्व्हे नंबरमध्ये नागरिकांनी घरे बांधली आहेत,त्याचा एकत्रित ले आउट करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित सर्व्हे नंबरचा मोजणी नकाशा, फाळणी नकाशा मिळून येत नाही. ह्याच बरोबर गुंठेवारी क्षेत्रात अगोदरच बांधकामे झाल्यामुळे नियमानुसार रस्ते व खुली जागा उपलब्ध होत नाही. पर्यायाने सदर सर्व्हे नंबरचा एकत्रित ले आउट करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यातच शास्तीकर आकारण्यात येत असल्याने आपण आपल्याच घरात राहतो,का भाड्याच्या घरात राहतो? अशी भावना इस्लामपूर शहरात राहणाऱ्या मालमत्ता धारकांच्यामध्ये निर्माण झाली आहे. या शास्तीकरामुळे शहरातील मालमत्ताधारकां च्या कौटुंबिक आर्थिक नियोजनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे,असे निवेदनात म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, सांगली जिल्हाधिकारी व इस्लामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकांना ही निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
यावेळी माजी संचालक शंकरराव पाटील, माजी नगरसेवक आयुब हवलदार,युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,अभिजित रासकर,अभिजित कुर्लेकर,पदवीधर सेलचे राज्य सरचिटणीस विशाल सुर्यवंशी,स्वरूप मोरे,हिंदुराव माळी,रवि वाघमोडे,शकील जमादार,अंकुश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.













































































