Last Updated on 26 Mar 2025 10:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर शहरातील ऊरुण भागात एका महिलेच्या दारात करणी व जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराच्या दारासमोर अघोरी साहित्य ठेवले होते. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महिलेच्या घरासमोर बकऱ्याचे मुंडके आणि चार पाय रंगीत दोरीने बांधून टाकण्यात आले होते. त्याच्यावर लिंबू लावले होते, ज्यामध्ये सुया व पिना टोचलेल्या होत्या. तसेच तीन नारळ काळ्या बाहुल्यांसह दोरीने बांधून, त्यावर टाचण्या लावलेल्या होत्या. दारासमोर २१ अर्धवट कापलेले लिंबू ठेवण्यात आले होते, त्यातही सुया टोचलेल्या होत्या. याशिवाय मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेल्या झाडाच्या फांद्या, पपई, कोरफडीचे तुकडे आणि हळदी-कुंकू, गुलाल टाकण्यात आला होता.
हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रबोधन
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत अशा अघोरी प्रकारांना बळी न पडण्याचे मार्गदर्शन केले.
इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. संजय बनसोडे यांनी कुटुंबीय आणि जमलेल्या नागरिकांचे प्रबोधन केले.
“अशा अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवू नये. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगायला हवे. करणी-जादूटोणा करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्र जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत (२०१३) अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी साहित्य ताब्यात घेतले
संजय बनसोडे यांनी सर्व संशयास्पद साहित्य गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संबंधित महिलेने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे इस्लामपूर शहरात एकच चर्चा रंगली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.













































































