Last Updated on 26 Dec 2024 7:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मूळचा ( मेडद ) बारामतीचा : कोणत्याही खासगी शिकवणी वर्गा शिवाय मिळवले यश
![]()
सांगली/विनोद मोहिते
भटकंती करत “पालावर” संसार थाटणाऱ्या कुटुंबातील अमोल चिमाजी गोंडे हा तरुण पीएसआय पदावर विराजमान झाला आहे. इस्लामपुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाची अक्षरे गिरवणारा अमोल हिंदू – मेढंगीजोशी नंदीबैलवाले समाजातील पहिलाचं अधिकारी झाला आहे.
इस्लामपुरातील ख्रिश्चन बंगल्याच्या रिकाम्या मैदानावर १९९९ साली नंदीबैला सोबत भटकंती करत गोंडे कुटुंबातील पाल आली होती. दरम्यान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शकुंतला पाटील या कर्तव्यदक्ष शिक्षिकेच्या पुढाकाराने तो शिक्षणाच्या प्रवाहात आला होता. झोपडपट्ट्या उठल्यावर सगळी कुटुंब साताऱ्याला गेली. चौथी स्कॉलरशिप मध्ये हुशार असणाऱ्या अमोल व त्याचा चुलत भाऊ दिवाणजी या दोघांचा स्वतःच्या घरी सांभाळ केला. त्यावेळी शिक्षिका असणाऱ्या सरोजनी मोहिते यांचेही सहकार्य मिळाले.

रिकाम्या मैदानावर नंदीबैल घेऊन आलेल्या झोपड्यात दिसणारी लहान लहान मुले पाहून शकुंतला पाटील यांनी या शाळा बाह्य मुलांची नोंदणी केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले. अडाणी असणाऱ्या समाजाला समजावणे खूप अवघड काम होते. दररोज सकाळी नंदीबैलावर बसून भविष्य सांगत हिंडणाऱ्या बापाबरोबर मुलं जायची. त्यांना त्यापासून रोखले आणि जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक दोन च्या शिवनगर भाग शाळेत आणले. तिथे प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू दिले.
त्यानंतर मेडद ( बारामती) या मूळ गावी सहावी आणि सातवी व माध्यमिक व १२ वी पर्यंतचे शिक्षण असेच भटकंती करत वेगवेगळ्या गावांमध्ये पूर्ण केले. बारामती येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अशिक्षित समाजामध्ये वाढलेल्या अमोलचे वयाच्या २१ व्या वर्षीच लग्न झाले. त्यांनतर दोन मुले झाली.
मुलगी अमिता आणि मुलगा आरुष जिल्हा परिषद शाळा शिकतात. पत्नी नम्रता ही गोधड्या शिवते. अमोलच्या कुटुंबात एकूण २२ सदस्य आहेत आई-वडिलांनी चार भाऊ,भावांची मुले आणि इतर सर्वजण राहतात. वडिल, व सर्व भाऊ नंदीबैल घेऊन दारोदारी भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई, बायको आणि वहिनी हातावर गोधड्या शिवतात. अशा परिस्थितीत अमोलने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.

२०१४ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ ला एमपीएससीची अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात पीएसआयची पूर्व व मुख्य परीक्षा झाला.फिजिकल परिक्षेत यश मिळाले पण अंतिम यादीत नाव आले नाही. त्यानंतर २०१७ ते २०१९ दरम्यान तीन पीएसआय च्या मुख्य परीक्षेत यश मिळवले. पण मुलाखतीसाठी निवड झाली नाही. जुलै २०२३ च्या अंतिम यादीत निवड झाली. विविध पदांसाठीच्या एकूण १३ मुख्य परीक्षा दिल्या होत्या मात्र निवड झाली नव्हती. स्वयं अध्ययनाच्या जोरावर संसार करत यश मिळवले. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पदवीदान समारंभात त्याने पोलीस उप निरीक्षक पदाची रँक घेत नागपूर येथे पोलीस दलात रुजू होणार आहे.
![]()
मी व माझ्या सुना गोधड्या शिवतो. घरची परिस्थिती हालाखीची असताना परिस्थितीवर मात करून अमोलने शिक्षण घेतले. आतां तो साहेब होऊन समाजाचे नाव कमवेल. आतां आमची भटकंती थांबेल. सुखाचा घास खायला मिळेल.”
मालन गोंडे
अमोलच्या आई
![]()
माझा पोरगा साहेब झालाय यावर विश्वास बसत नाही. आमच्यासारख्या गरीबाचा मुलगा साहेब होऊ शकतो असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. आम्ही दारोदारी जाऊन लोकांना राम राम घालतो. नमस्कार करतो. माझ्या मुलाला लोक सॅल्यूट घालतील याचा अभिमान वाटतो. मुलामुळे आमचा समाज थोडाफार शिक्षणाकडे वळेल.
चिमाजी गोंडे
वडील
![]()
मला शाळेचे दार उघडून देणाऱ्या माझ्या शिक्षिका शकुंतला पाटील आज हयात नाहीत. त्यांची आज आठवण होतेय. त्यांच्या कचरे गल्लीतील घरी केलेले वास्तव्य आणि घरातील सर्वांकडून मिळालेले बाळकडू मला प्रेरणा देणारे ठरले. शाळेतील बाईंच्या घरी राहिलो त्यांचा मुलगा कर्नल रणजीत पाटील यांची त्यावेळी लष्करात निवड झाली होती. त्याचवेळी मला शिकून मोठं व्हायची प्रेरणा व संस्कार मिळाले. बाईंच्या घरातील सर्वांकडून मला शिकण्याची उर्मी मिळाली आणि त्याच्या जोरावरच मी माझे भवितव्य घडवले. माझे यश पाहण्यासाठी माझ्या बाई हव्या होत्या. मी माझ्या नोकरीत प्रामाणिकपणे सेवा करून आदर्शवत काम करणार आहे.”
अमोल गोंडे
पीएसआय
![]()
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 20 Apr 2026 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit २० ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा मुंबई । भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी... Read more














































































